दामोदर नाट्यगृहासाठी मराठी कलाकार आमरण उपोषणाला बसणार

गेली अनेक महिने गाजत असलेल्या दामोदर नाट्यगृहाच्या प्रश्नावर नाटय कलाकार आक्रमक झाले आहे.  “सुधारित आराखडा सादर केल्याशिवाय नाट्यगृहाच्या तोडकामाची बंदी उठवली जाणार नाही” असे शासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही आणि विधानपरिषदेत मा उदय सामंत यांनी  शासनाच्या वतीने तसे सांगितल्यानंतरही सोशल सर्विस लीगने निवडणूक आचार संहितेच्या आडून गुपचूप नाट्यगृहाचे तोडकाम सुरू केल्यामुळे दामोदर नाट्यगृहाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मा. प्रशांत दामले व  बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष मा. नीलम ताई शिर्के-सामंत यांनी यशवंतराव नाटय संकुलात  आज दि. 15 मे 2024 रोजी पत्रकार परिषद घेतली.

विधानसभेत तोडकामाला स्थगिती दिलेली असताना सुद्धा तोडकाम केलं आहे त्याचा निषेध तीव्र निषेध प्रशांत दामले आणि नीलम शिर्के-सामंत यांनी केला. 

या पत्रकार परिषदेत त्यांनी नाट्यगृह आरक्षण बदलावर तीव्र आक्षेप घेतला आणि खालील  मागण्या शासना पुढे ठेवल्या आहेत.

1) नाट्यगृहाचे आणि शाळेचे बांधकाम एकाच वेळी सुरु करून एकाच वेळी संपवणे आणि हे लिखित स्वरूपात असावे.

2) प्रस्तावित दामोदर नाट्यगृह किमान 750 आसनांचे नाट्यगृह असणे अत्यावश्यक आहे. 

3) नाट्यगृहाचा वाढीव  FSI नाटकाशी संबंधित उपक्रमासाठीच वापरला जावा. 

4) दामोदर नाट्यगृहाच्या काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना आणि सहकारी मनोरंजन मंडळाच्या डोअर किपर्सना पूर्वीप्रमाणेच नव्या नाट्यगृहात काम मिळावे.  तोपर्यंत त्यांना पर्यायी रोजगार मिळावा.

5) नव्या दामोदर नाट्यगृहात पूर्वीप्रमाणेच सहकारी मनोरंजन मंडळाचे कार्यालय/तालमीची जागा असावी. त्यासाठी प्रस्तावित आराखड्यात त्याची तशी नोंद असावी. नव्या नाट्यगृहाचे निर्माण होईपर्यंत सहकारी मनोरंजन मंडळास वापरण्यायोग्य पर्यायी जागा मिळावी. लेखी करार व्हावा.

6) शाळा व नाट्यगृह ह्यांचे एन्ट्री गेट वेगवेगळे असावे. 

7) नाट्यगृहाचे भाडे हे मर्यादित असावे.

10) नाट्यगृह तळ मजल्यावरच असावे.

ह्या सर्व मागण्यासाठी आम्ही  मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेणार आहोत. 

           दोन्ही संस्था ह्या मराठी माणसांशीच संबंधित असल्याने हा प्रश्न समोपचाराने सोडवावा हीच आमची अपेक्षा आहे. पण मुजोरपणा करून कोणी नाट्यगृहाचा घास घेऊ पाहिल, तर  दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी नाट्यपरिषद/ मराठी नाट्य कलाकार आमरण उपोषण करतील, असे वक्तव्य  प्रशांत दामले यांनी केलं.

नीलम शिर्के -सामंत यांनी याप्रसंगी दामोदर नाट्यगृहाशी संबंधित त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या.  नमन दशावतार, शक्ती तुरे यांसारख्या ग्रामीण भागातील लोककलांचे  माहेरघर असलेल्या दामोदर नाट्यगृहात नव्या कलाकारांना हक्काचा आश्रय मिळत होता. गेली शंभर वर्ष अव्याहतपणे नाट्यकलेचा वारसा जपणाऱ्या दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ याचं अस्तित्व टिकलं पाहिजे. आणि शासनाने विधिमंडळात यावर उत्तर दिलेलं असतानाही कुणी मुजोरपणे नाट्यगृहावर हातोडा घालत असेल तर त्यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे…

शासन कला आणि कलाकारांसाठी संवेदनशील आहे त्यांनी कलाकारांना न्याय द्यावा अन्यथा मीही प्रशांत दामलें सोबत आमरण उपोषण करिन अशी ग्वाही दिली. याप्रसंगी प्रशांत दामले, नीलम शिर्के-सामंत, यांच्यासह जेष्ठ कलाकार उपेंद्र दाते, मेघा घाडगे, अपेक्षा कदम,  अजित भुरे, दिलीप जाधव, परमानंद पेडणेकर, रत्नकांत जगताप, सतीश लोटके, माई मीडिया च्या शीतल करदेकर, सूरज,  गणेश तळेकर, निलांबरी खामकर, राजू तुलालवर, आधी नाट्यकर्मी तसेच सहकारी मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद तांबे, के राघव कुमार, श्रीधर चौगुले, दक्षता गीसावी, श्रावण धाटोबे, रुपेश कदम, राहुल पवार, अमोल तेली आदी पदाधिकारी तसेच डोअर किपर्स उपस्थित होते.

Leave a comment