
मुंबई, २ फेब्रुवारी २०२५: अॅरेंज्ड मॅरेज या संकल्पनेवर आधारित आणि ग्रामीण भागातील लग्नाच्या गोष्टीला स्पर्श करणाऱ्या ‘स्थळ’ या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे.
टीझर लॉन्चच्या आधी प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ पोस्ट करत, ‘स्थळ’ चा टीझर येत असल्याची माहिती दिली होती. त्यांच्या या घोषणेमुळे टीझर आणि एकूणच चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढली. महिला दिनाच्या औचित्याने ७ मार्च रोजी ‘स्थळ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अनोखी कथा, वेगळी मांडणी

सर्वसाधारणपणे लग्नासाठी स्थळ पाहायला गेल्यावर मुलगा आणि त्याचे कुटुंबीय मुलीला प्रश्न विचारतात. त्या वेळी बावरलेली मुलगी उत्तर देण्याचा प्रयत्न करते, तिच्या उत्तरात काही चूक होऊ नये म्हणून धडपड करते. मात्र, मुलीऐवजी जर मुलाला प्रश्न विचारले गेले, तर काय होईल? हा नवा विचार ‘स्थळ’ चित्रपटाच्या टीझरमध्ये मांडण्यात आला आहे.
‘स्थळ’ हा चित्रपट अॅरेंज्ड मॅरेज आणि स्थळ पाहण्याच्या संकल्पनेवर आधारित असला, तरी तोचतोचपणा टाळत मनोरंजक आणि हटके पद्धतीने या विषयाला हाताळण्यात आले आहे.
प्रतिष्ठेच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळालं विशेष स्थान
‘स्थळ’ हा चित्रपट आतापर्यंत टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसह तब्बल २९ महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला आहे. तसेच, या चित्रपटाने १६ पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत.
दिग्दर्शन आणि स्टारकास्ट

चित्रपटाची निर्मिती जयंत दिगंबर सोमलकर, शेफाली भूषण, करण ग्रोवर आणि रिगा मल्होत्रा यांनी केली असून, जयंत दिगंबर सोमलकर यांनीच चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.
चित्रपटात नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग धवस, संदीप सोमलकर, संदीप पारखी, स्वाती उलमाले, गौरी बदकी, मानसी पवार यांसारख्या नव्या दमाच्या कलाकारांचा समावेश आहे.
७ मार्चला ‘स्थळ’ येणार तुमच्या भेटीला!
आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळवलेला ‘स्थळ’ हा चित्रपट आता ७ मार्च रोजी थेट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लग्नसंस्थेतील रूढी, सध्या बदलत चाललेली मानसिकता, तसेच एक वेगळ्या दृष्टीकोनातून स्थळ पाहण्याची प्रक्रिया अनुभवायची असेल, तर हा चित्रपट नक्की पाहा!
