१०० व्या नाट्यसंमेलनातील विशेष नाट्य महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न

मुंबई, २ मार्च: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त आयोजित विशेष नाट्य महोत्सवाचा सांगता सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभाला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, तसेच मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे उपस्थित होते. या नाट्य महोत्सवात बंगाली, तमिळ, इंग्रजी आणि मराठी अशा बहुभाषिक नाटकांचे सादरीकरण करण्यात आले, ज्याचा आस्वाद नाट्यरसिकांनी घेतला.

मा. आशिषजी शेलार यांनी आपल्या भाषणात मराठी नाट्यसंस्कृतीच्या उगमाविषयी गहन संशोधन करण्याची गरज व्यक्त केली. ते पुढे म्हणाले,
“विष्णुदास भावेंपासून नाट्यसंस्कृतीचे शंभर वर्ष आपण साजरे करत आलो असलो, तरी त्याआधीपासून आपल्या लोककलांमध्ये नाट्यपरंपरा रुजलेली आहे. त्याचा सखोल अभ्यास आवश्यक आहे. आम्ही एका तज्ज्ञ समितीची स्थापना करू, आणि त्यासाठी लागणारा सर्व खर्च राज्यसरकार करेल,” असे आश्वासन त्यांनी दिले.

सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून राज्य सरकार नाट्यपरिषदेला कायम पाठिंबा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विशेष नाट्यप्रयोग आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगता सोहळ्यात प्रेक्षकांनी ‘चिनाब से रावी तक’, ‘१४ इंचाचा वनवास’, आणि ‘अविघ्नेया’ या नाटकांचा आनंद घेतला.

या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचा मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

मा. विकास खारगे यांनी नाट्यसंमेलनाच्या ऐतिहासिक आयोजनाचे कौतुक करताना म्हणाले,
“महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाट्यसंस्कृती रुजवण्यासाठी संमेलनादरम्यान वर्षभर नाट्य उपक्रम राबवण्यात आले. यामुळे नवोदित कलाकारांना नाट्यपरंपरेची ओळख झाली. सांस्कृतिक विभाग नाट्य परिषदेच्या पाठीशी कायम राहील.”

१०० व्या नाट्यसंमेलनातील विशेष कार्यक्रमांची झलक

१९ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या १०० व्या नाट्यसंमेलनात विविध बहुभाषिक नाटकांसह नाट्यजागर स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, बालनाट्य, नाट्यवाचन, एकपात्री प्रयोग आणि नाट्यछटा यांसारख्या कार्यक्रमांनी रंगत आणली.

कार्यक्रमाच्या अखेरीस प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्या संकल्पनेवर आधारित संपूर्ण नाट्यमहोत्सव यशस्वी केल्याबद्दल नाट्यरसिकांचे आभार मानले.

🎭 १०० वर्षांची गौरवशाली नाट्यपरंपरा – भविष्यातील संशोधन आणि नव्या नाट्यप्रयोगांसाठी महत्त्वाचा टप्पा!

Leave a comment