‘केतकी कुलकर्णी यांचे पाच वर्षांनी मराठी मालिकेत पुनरागमन’

‘कमळी’ मालिकेत अनिकाच्या भूमिकेतून दमदार एन्ट्री

‘झी मराठी’वरील ‘कमळी’ या मालिकेतून अभिनेत्री केतकी कुलकर्णी पाच वर्षांनंतर मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करत आहे. ‘अनिका’ या व्यक्तिरेखेच्या रूपाने प्रेक्षकांना तिच्या अभिनयाचा नवा आयाम पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील तिचा प्रवास, पहिल्या शूटचे आठवणी, आणि भूमिका साकारताना आलेल्या अनुभवांविषयी तिने मनमोकळ्या गप्पा मारल्या.

पहिल्या शूटिंगचा अनुभव अजूनही ताजा

केतकी सांगते, “प्रोमोशूटचा तो पहिला दिवस अजूनही माझ्या आठवणीत ताजा आहे. सकाळी लवकर सिम्बायोसिस कॉलेजमध्ये शूट होत होतं आणि त्या ठिकाणी माझे अनेक मित्र शिकत असल्यामुळे अनुभव अधिक खास होता. डान्स आणि रॅप सीन करताना एकदम मजा आली. पहिल्यांदाच मी रॅप करत होते आणि तेही इतक्या मोठ्या सेटवर, त्यामुळे हा अनुभव कायम लक्षात राहणारा ठरला.”

पाच वर्षांनंतर पुन्हा छोट्या पडद्यावर येण्याचा आनंद

“अनिकाच्या भूमिकेसाठी माझी निवड झाली तेव्हा मी सर्वप्रथम आई-बाबांना ही बातमी दिली. अभिनय क्षेत्रातून काही काळ दूर राहिल्यानंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर परतणं म्हणजे खरंच माझ्यासाठी भावनिक क्षण होता,” असं केतकी म्हणाली. “प्रोमो आल्यावर मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद, विशेषतः रॅपवरचं कौतुक, यामुळे मन भरून आलं.”

अनिका – एक लाडावलेली पण मेहनती खेळाडू

केतकीच्या मते, ‘अनिका’ हे पात्र एक श्रीमंत आणि लाडावलेली मुलगी आहे, जिला राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियन होण्याचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. तिचं राहणीमान एलिट आहे, पण तिचं प्रत्येक निर्णय शिस्तबद्ध आहे. तिच्या प्रत्येक कृतीला एक लॉजिक आहे आणि तिच्या भावना आहेत, हे समजून घेतलं तर प्रेक्षक तिला नकारात्मक नव्हे तर प्रेरणादायी देखील मानतील.

भूमिकेसाठी गाडी चालवण्यापासून आत्मविश्वास मिळवण्यापर्यंतचा प्रवास

“अनिकाच्या भूमिकेसाठी मला गाडी चालवायला शिकावं लागलं. सुरुवातीला भीती वाटायची, पण आता मी आत्मविश्वासाने गाडी चालवते. प्रत्येक पात्रासाठी वेगळी तयारी लागते आणि मी ती मनापासून केली आहे. ‘अनिका’ फक्त खलनायिका नाही, ती ठाम आणि आत्मविश्वासाने भरलेली मुलगी आहे,” असं केतकीने नमूद केलं.

प्रेक्षकांच्या प्रेमाची अपेक्षा

केतकी म्हणते, “प्रेक्षकांनी मला नेहमीच प्रेम दिलं आहे. आता पुन्हा त्यांच्या भेटीला ‘कमळी’ मालिकेतून येत आहे, तेव्हा त्यांचं पाठबळ हीच माझ्यासाठी खरी शक्ती आहे. ही भूमिका माझ्यासाठी एक नवा टप्पा आहे.”

बघायला विसरू नका ‘कमळी’ दररोज रात्री ९:०० वा. फक्त झी मराठी वाहिनीवर.

Leave a comment