
शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने सुरू झालेला ‘नाट्यकलेचा जागर’ उपक्रम यंदा राज्यभर साजरा होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धा ‘नाट्य परिषद करंडक’ आयोजित करण्यात आली असून याची घोषणा नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केली.
कलावंतांना राज्यव्यापी मंच देण्याचा उपक्रम
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील नाट्यकर्मींसाठी ही स्पर्धा खुली असून अधिकाधिक कलाकारांनी सहभागी व्हावं, असं आवाहन उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केलं आहे. ही स्पर्धा केवळ स्पर्धा न राहता, कलाकारांना अनुभव, संवाद आणि नाट्य संस्कृती जपण्याचा एक महत्त्वाचा मंच ठरणार आहे.
दोन टप्प्यांत होणार स्पर्धा; अंतिम फेरी मुंबईत
स्पर्धेची प्राथमिक फेरी २३ व २४ ऑगस्ट २०२५ रोजी विविध केंद्रांवर होणार असून अंतिम फेरी मुंबईतील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल येथे १५ ते १८ सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे. अंतिम फेरीतील कलाकारांसाठी खास कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून त्यात दिग्गज मार्गदर्शक सहभागी होणार आहेत.
स्पर्धेत मिळणार भरघोस पारितोषिकं
सर्वोत्कृष्ट एकांकिकेस रु.१,००,०००/- चे प्रथम पारितोषिक, द्वितीय रु.७५,०००/- व तृतीय रु.५०,०००/- अशी रोख पारितोषिकं दिली जाणार आहेत. याशिवाय दोन उत्तेजनार्थ पारितोषिकं रु.१५,०००/- प्रत्येकी आणि दिग्दर्शन, लेखन, अभिनय आदी वैयक्तिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी रोख पारितोषिकं ठेवण्यात आली आहेत.
प्रत्येक सहभागी संस्थेला मानधन आणि सहभागपत्र
प्राथमिक फेरीतील प्रत्येक सादरीकरणासाठी रु.२०००/- चे मानधन देण्यात येणार असून सर्व सहभागी संस्थांना सहभाग प्रमाणपत्रही दिलं जाणार आहे. एकांकिकेसाठी प्रवेश फी रु.१०००/- इतकी असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत.
१० ऑगस्ट २०२५ ही शेवटची तारीख
स्पर्धेसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया http://www.natyaparishad.org या संकेतस्थळावर सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२५ संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी ८५९१७०६८८७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
कलावंतांना आणि तरुण विद्यार्थ्यांना सादर करण्याची अनोखी संधी
विद्यार्थी, हौशी कलाकार, महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय नाट्य विभागातील अभ्यासकांसाठी ही एक दुर्मिळ संधी असून नाट्य परिषदेच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमात राज्यभरातून उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.
