
सत्य घटनांशी नातं सांगणाऱ्या आणि आजही तितक्याच ताकदीने भिडणाऱ्या नाटकांच्या यादीत ‘महापूर’ या नाटकाचं नाव आवर्जून घ्यावं लागतं. सतीश आळेकर यांच्या लेखणीतून साकारलेलं हे नाटक आता सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नव्या स्वरूपात रंगभूमीवर सादर होत आहे. यानिमित्ताने १५ ऑगस्ट रोजी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात भव्य प्रीमियर आयोजित करण्यात आला आहे.
नव्या पिढीकडून जुन्या संहितेला नवा चेहरा

या नव्या सादरीकरणाचं पुढाकार घेतला आहे अभिनेता आरोह वेलणकर यांनी. ‘महापूर’ नाटकाची निर्मिती वाइड विंग्ज मीडिया करत असून दिग्दर्शनाची जबाबदारी ऋषी मनोहर यांच्याकडे आहे. पुण्यातील प्रयोगांनंतर आता हे नाटक मुंबईत प्रेक्षकांसमोर येणार आहे.
१५ वर्षांपूर्वीची प्रेरणा आणि सतीश आळेकर यांची परवानगी
पत्रकार परिषदेत बोलताना आरोह वेलणकर म्हणाले, “१५ वर्षांपूर्वी पुरुषोत्तम करंडक दरम्यान ज्येष्ठ समीक्षक माधव वझे यांनी हे नाटक मी करावं असं सुचवलं होतं. सतीश आळेकर यांच्याशी एका शॉर्ट फिल्म निमित्ताने झालेल्या संवादातून या नाटकासाठी परवानगी मिळाली आणि आज ते रंगमंचावर सादर करताना आनंद होतोय.”
मोहन गोखल्यांची भूमिका आणि नव्या प्रवासाची सुरुवात
१९७५ मध्ये रंगभूमीवर आलेल्या ‘महापूर’मध्ये मोहन गोखले यांनी साकारलेली भूमिका आता आरोह वेलणकर साकारत आहेत. हा प्रवास एक प्रायोगिक उपक्रम म्हणून सुरू झाला असला, तरी आता त्याचा व्यावसायिक विस्तार केला जात आहे. प्रीमियरनंतर अधिकाधिक नाट्यरसिकांपर्यंत हे नाटक पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.
सतीश आळेकरांच्या संहितेचा कालातीत परिणाम

दिग्दर्शक ऋषी मनोहर यांच्या मते, “ही संहिता आजही प्रेक्षकांना तितक्याच प्रभावीपणे भिडते. प्रत्येक प्रयोगानंतर कलाकारांबद्दल होणारं कौतुक हे यशाचं प्रमाण आहे.”
नाटकाच्या पुनरुज्जीवनाकडे एक महत्त्वपूर्ण टप्पा
अभिनेत्री रेशम श्रीवर्धनकर यांनी हे सादरीकरण भावी पिढ्यांसाठी मौल्यवान ठरेल असं मत व्यक्त केलं. “रिकॉलच्या युगात जुन्या नाटकांना नव्यानं मांडणं हे महत्त्वाचं आहे. कलाकार म्हणून देखील ही भूमिका समाधान देणारी आहे,” असं त्यांनी सांगितलं.
व्यक्तिगत घुसमटीचं वास्तववादी चित्रण
‘महापूर’ ही कथा एका तरुणाच्या मानसिक संघर्षाची आणि त्याच्या प्रेमभंग, अपूर्ण शिक्षण, कौटुंबिक गुंतागुंत यामधून होत जाणाऱ्या मानसिक अस्थैर्याची जाणीव करून देते. या भूमिकेत आरोह वेलणकर प्रमुख आहेत. त्यांच्या जोडीला दिलीप जोगळेकर, प्रसाद वनारसे, रेशम श्रीवर्धनकर, धीरेश जोशी, रेणुका दफ्तरदार यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
तांत्रिक बाजूंची भक्कम साथ
नाटकाचे निर्मितीप्रमुख कुशल खोत, व्यवस्थापक सौरभ महाजन आहेत. सारंग कुलकर्णी यांचं पार्श्वसंगीत, तेजस देवधर यांची प्रकाशयोजना, देविका काळे यांची वेशभूषा आणि ऋषी मनोहर व मल्हार विचारे यांचं नेपथ्य यामुळे सादरीकरण अधिक उठावदार होतं. रंगमंच व्यवस्थापनाची जबाबदारी वज्रांग आफळे, गणेश सोडमिसे, मल्हार विचारे, प्रणव शहा यांनी पार पाडली आहे.
