
झी मराठीवरील नव्या मालिकेच्या भव्य स्वागतासाठी एक अनोखा आणि ऐतिहासिक अनुभव देण्यात आला. ‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेची पत्रकार परिषद मुंबईतील जगप्रसिद्ध पंचतारांकित ताज महाल पॅलेस हॉटेलमध्ये पार पडली. गेटवे ऑफ इंडियाच्या साक्षीने, गेल्या अनेक दशकांपासून रॉयल्टी आणि प्रतिष्ठित पाहुण्यांचं आदरातिथ्य करणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूत झी मराठीने आपल्या नव्या मालिकेचं भव्य स्वागत केलं.
स्किटमधून पात्रांची ओळख आणि कथानकाची झलक
पत्रकार परिषदेला सुरुवात झाली एका सुंदर सादरीकरणाने. मालिकेतील प्रमुख कलाकारांनी रंगमंचावर एक सर्जनशील स्किट सादर करत पात्रांची ओळख करून दिली. यात अधिरा आणि रोहनच्या आयुष्यातील एक खास क्षण दृश्यरूपात सादर करण्यात आला, ज्यामुळे उपस्थितांना कथानकाची भावनिक झलक अनुभवता आली.

संपूर्ण टीमची उपस्थिती आणि संवादांची रंगत
या प्रसंगी कलाकारांच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिक भारदस्त झाला. सुबोध भावे (समर राजवाडे), तेजश्री प्रधान (स्वानंदी सरपोतदार), राज मोरे (रोहन सरपोतदार), पूर्णिमा डे (अधिरा राजवाडे), सुलभा आर्य (नलिनी आजी), भारती पाटील (मंदाकिनी सरपोतदार), किशोरी आंबिये (मल्लिका राजवाडे), किशोर महाबोले (दिलीप सरपोतदार), हरीश थोरात (अंशुमान राजवाडे), अपूर्वा विजय (सुष्मिता सरपोतदार), अक्षता नाईक (अर्पिता) हे सर्व कलाकार उपस्थित होते.
सुबोध भावेंकडून पाहुण्यांना शाही ५-कोर्स मेजवानीचं आमंत्रण
स्किटनंतर समर राजवाडेची भूमिका साकारणारे सुबोध भावे यांनी राजवाडे कुटुंबातर्फे उपस्थित पाहुण्यांना खास ५-कोर्स मेजवानीसाठी आमंत्रित केलं. आलिशान सजावट, सुंदर संवाद आणि झी मराठीच्या उत्तम आदरातिथ्यामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेलं.
मालिकेच्या भावनिक कथानकाचं भव्य प्रारूप
‘वीण दोघातली ही तुटेना’ ही मालिका केवळ एक कथा नाही, तर दोन कुटुंबांच्या, दोन विचारसरणींच्या, आणि दोन हृदयांच्या जुळवणीची भावना आहे. झी मराठीने या भव्य पत्रकार परिषदेद्वारे सिद्ध केलं की प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ स्क्रीनवरच नव्हे, तर अनुभवातूनही कथा सादर करता येते.

११ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या मालिकेची प्रतीक्षा
‘वीण दोघातली ही तुटेना’ ही मालिका येत्या ११ ऑगस्टपासून सोम-शनि संध्याकाळी ७:३० वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठीवर सादर होणाऱ्या या नव्या मालिकेचा भव्य प्रारंभ पाहिल्यानंतर तिच्याशी प्रेक्षक निश्चितच जोडले जातील, हे निश्चित.
