
झी स्टुडिओज प्रस्तुत ‘दशावतार’ या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटातील हृदयस्पर्शी ‘रंगपूजा’ ही भैरवी नुकतीच रसिकांच्या भेटीस आली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील दशावतार परंपरेला मोठ्या पडद्यावर भव्यतेने मांडणाऱ्या या चित्रपटातील हे गीत कलावंताच्या कलेवरील श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाची भावना व्यक्त करतं. हे गाणं म्हणजे रंगभूमीवरील कलाप्रवासाला भावपूर्ण अभिवादन आहे.
भन्नाट त्रिकुटाची साथ
या गाण्यासाठी गीतकार गुरु ठाकूर, गायक अजय गोगावले आणि संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र हे तिघे प्रथमच एकत्र आले आहेत. गुरु ठाकूर यांची अर्थपूर्ण शब्दरचना, अजय गोगावले यांचा आर्त आवाज आणि ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांच्या सुरेल संगीतामुळे गाण्याला एक वेगळाच आयाम मिळाला आहे. हे गाणं चित्रपटातील नायक बाबुली मेस्त्रीच्या आयुष्याचं मर्म अधोरेखित करतं.
अजय गोगावले यांची भावना

गायक अजय गोगावले म्हणाले, “दशावतार नाटकांमध्ये जशी नांदी महत्त्वाची असते, तशीच रंगपूजा ही भैरवीही महत्त्वाची असते. ही भैरवी प्रत्येक कलाकाराचं मर्म आहे. गुरु ठाकूरचे शब्द आणि ए. व्ही. प्रफुल्लचंद्रचं संगीत गाताना मला वेगळं समाधान मिळालं. त्यामुळे या चित्रपटाचा भाग होऊ शकलो, याचा मला खूप आनंद आहे.”
संगीतकार आणि गीतकारांची प्रतिक्रिया
संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी सांगितलं की अजय गोगावले यांच्यासोबत काम करण्याची त्यांची इच्छा ‘दशावतार’मुळे पूर्ण झाली आणि हा त्यांच्या संगीतप्रवासातील एक आनंदाचा क्षण आहे. गीतकार गुरु ठाकूर म्हणाले की, “कलाकृतीसाठी निवड होणं हे भाग्य असतं. माझ्या गाण्यांना अजयचा आवाज मिळतो तेव्हा मी निश्चिंत असतो. या गाण्याचं रेकॉर्डिंग ऐकताना मी आणि दिग्दर्शक सुबोध खानोलकर हळवे झालो होतो.”
चित्रपटाची भव्यता
झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले आहे. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे आणि रवी काळे यांसारखे दिग्गज कलाकार चित्रपटात भूमिका साकारत आहेत. येत्या १२ सप्टेंबरला जगभर प्रदर्शित होणारा ‘दशावतार’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भव्य अनुभव ठरणार असून अजय गोगावले यांच्या आवाजातील ‘रंगपूजा’ ही भैरवी या चित्रपटाचा कळसाध्याय ठरणार आहे.
