‘सावनी रेकॉर्डझ्’ या म्युझिक लेबलची घोषणा

मराठी संगीतविश्वात आपल्या मधुर, भावस्पर्शी आणि ताकदीच्या आवाजाने वेगळी ओळख निर्माण करणारी राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्वगायिका सावनी रवींद्र आता एका नव्या भूमिकेतून संगीतप्रेमींसमोर आली आहे. तिच्या आवाजातील गोडवा, अभिव्यक्तीची ताकद आणि प्रत्येक गाण्यातून जाणवणारी भावना यामुळे सावनीने रसिकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे आणि आता हाच सुरेल प्रवास पुढे नेत ती स्वतःचं म्युझिक लेबल घेऊन सज्ज झाली आहे.

‘सावनी रेकॉर्डझ्’ची अधिकृत घोषणा

‘सावनी रेकॉर्डझ्’ या नावाने तिने आपल्या म्युझिक लेबलची अधिकृत घोषणा नुकत्याच पार पडलेल्या सोहळ्यात केली. मराठी संगीतविश्वातील दिग्गज गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या हस्ते या म्युझिक लेबलचे लाँच करण्यात आले. यावेळी संगीत सृष्टीतील अवधूत गुप्ते, अभिजीत सावंत, कौशल इनामदार, अविनाश – विश्वजीत, नंदेश उमप, ऋषिकेश कामेरकर, मंगेश बोरगावकर, निहार शेंबेकर यांच्यासह लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे उपस्थित होत्या.

‘मुजरा शिवबाला’ या गाण्याने सुरुवात

या लेबलअंतर्गत तिचं पहिलं गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत सावनी रवींद्रने ‘मुजरा शिवबाला’ हे पहिले गाणे सादर केले आहे. वैभव देशमुख यांच्या ओजस्वी शब्दांना विजय नारायण गवंडे यांचे दमदार संगीत लाभले असून सावनीच्या आवाजाने या गाण्याला वेगळीच उंची मिळाली आहे. या गाण्यात सावनी रवींद्रने गायनासह लावणीही सादर केली असून या निमित्ताने लावण्यवतींचा सन्मान करण्यात आला.

संगीतातील सातत्यपूर्ण प्रयोग

आजपर्यंत सावनीने संगीतामध्ये सातत्याने निरनिराळे प्रयोग केले आहेत. ‘सावनी ओरिजिनल्स’ या तिच्या यूट्यूब सिरीजअंतर्गत तिने विविध भाषांमध्ये गायन करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपटांच्या गाण्यांबरोबरच ती तिच्या संगीतिक प्रयोगांसाठीही ओळखली जाते.

नव्या उपक्रमामागील दृष्टीकोन

या नव्या उपक्रमाबद्दल सावनी सांगते की, सर्व अडचणींवर मात करत कुटुंब आणि सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे ती इथपर्यंत पोहोचली आहे. संगीत हेच तिचं बळ असून त्याच बळावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. ‘सावनी रेकॉर्डझ्’ हे केवळ म्युझिक लेबल नसून एक स्वप्न आहे, जिथे दर्जेदार, अर्थपूर्ण आणि मनाला भिडणारं संगीत साकारेल. पुढील काळात नव्या कलाकारांना संधी देत काहीतरी वेगळं आणि अभिमानास्पद घडवण्याचा तिचा प्रयत्न असेल.

सुरेश वाडकर यांची प्रतिक्रिया

सुरेश वाडकर यांच्या मते, ‘मुजरा शिवबाला’ या गाण्यातून जुन्या काळातील लावणीची ताकद आणि ठसका अनुभवायला मिळतो. सावनीने लावणीची परंपरा सुंदरपणे जपली आहे. गाण्याची चाल, शब्द आणि सादरीकरण प्रभावी असून सावनीने गायनासोबत उत्कृष्ट परफॉर्मन्सही दिला आहे. तिच्या या नव्या म्युझिक लेबलसाठी त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या.

अर्थपूर्ण लोगो आणि प्रेरणादायी पाऊल

‘सावनी रेकॉर्डझ्’चा लोगोही तितकाच अर्थपूर्ण आहे. महाराष्ट्रातील महिलांच्या ओळखीचं प्रतीक असलेल्या ‘चंद्रकोर’ आणि व्हिनाइल रेकॉर्ड डिस्क यांचा सुंदर संगम या लोगोमध्ये दिसतो. हा लोगो केवळ डिझाइन नसून संगीताची परंपरा, जिंकण्याची वृत्ती आणि दर्जेदार कामाची हमी दर्शवतो. मराठी स्त्री गायिकांमध्ये स्वतःचे म्युझिक लेबल सुरू करण्याचे धाडस फार कमी जणी करताना दिसतात. अशा परिस्थितीत सावनी रवींद्रने घेतलेलं हे पाऊल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Leave a comment