झी मराठीची प्रेक्षकांसाठी खास मेजवानी! ‘आपली दुपार’ आणि ‘मनोरंजनाचा Powerplay’

प्रेक्षकांची लाडकी झी मराठी नेहमीच नावीन्यपूर्ण आणि दर्जेदार कार्यक्रमांच्या माध्यमातून मनोरंजनाची मेजवानी देत आली आहे. प्रेक्षकांच्या वाढत्या अपेक्षा लक्षात घेत आता झी मराठी घेऊन येत आहे ‘आपली दुपार’ आणि ‘मनोरंजनाचा Powerplay’ हे दोन खास उपक्रम, जे प्रेक्षकांच्या दिवसाला अधिक रंगतदार बनवणार आहेत.

‘आपली दुपार’ – महिलांसाठी खास वेळ

१३ एप्रिलपासून दररोज दुपारी १ ते ३ या वेळेत ‘आपली दुपार’ या विशेष सत्रातून घरातील जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असणाऱ्या महिलांसाठी खास मनोरंजनाची मेजवानी सादर केली जाणार आहे. दिवसातील थोडा वेळ स्वतःसाठी राखून आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद घेण्याची ही उत्तम संधी ठरणार आहे.

या सत्रात ‘सावळ्याची जणू सावली’, ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘आम्ही सारे खवय्ये’ हे लोकप्रिय कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत बालकलाकार साईराज केंद्रे याची दमदार एण्ट्री होणार असून, या नव्या वळणामुळे कथानक अधिक उत्कंठावर्धक होणार आहे.

‘मनोरंजनाचा Powerplay’ – एक्स्ट्रा एंटरटेनमेंटचा डोस

‘मनोरंजनाचा Powerplay’ या उपक्रमातून प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांना आणखी रोमांचक बनवण्यात येणार आहे. ‘शुभ श्रावणी’, ‘वीण दोघातली ही तुटेना’, ‘तारिणी’ आणि ‘देवमाणूस – मधला अध्याय’ या मालिकांचे भाग आता ३० मिनिटांऐवजी ४५ मिनिटांचे असणार आहेत.

या ‘एक्स्ट्रा इनिंग्स’मुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिकांचा अधिक वेळ आनंद घेता येणार असून, कथानकातील प्रत्येक वळण अधिक सखोलपणे अनुभवता येणार आहे.

मनोरंजनाचा नवा अनुभव

‘आपली दुपार’ आणि ‘मनोरंजनाचा Powerplay’ या दोन्ही उपक्रमांमधून झी मराठी प्रेक्षकांच्या मनातील जिव्हाळा अधिक दृढ करत आहे. आनंद, उत्कंठा आणि भावनांनी परिपूर्ण असा हा मनोरंजनाचा अनुभव १३ एप्रिलपासून प्रेक्षकांना फक्त झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.

Leave a comment