
शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठीच्या संघर्षावर आधारित ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाच्या पोस्टरनंतर आता त्याच्या भव्य म्युझिक लाँच सोहळ्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वास्तवाशी जोडलेली गाणी, दमदार कलाकारांची उपस्थिती आणि संगीताच्या ठेक्यावर रंगलेला जल्लोष यामुळे हा सोहळा विशेष ठरला.
वास्तववादी आशयाची गाणी ठरली चर्चेचा विषय
चित्रपटातील प्रत्येक गाणं समाजातील अन्याय, संघर्ष आणि वास्तव मांडणारं असल्याचं या सोहळ्यात स्पष्टपणे जाणवलं. संगीत अनावरणासाठी अजय गोगावले, आनंद शिंदे, वैशाली माडे, राजा हसन यांच्यासह नितीन सावंत, अजित आणि सिद्धार्थ कश्यप उपस्थित होते.
‘मार तू शिक्का’ या गाण्याच्या सादरीकरणावेळी सपना चौधरी हिने गाण्याच्या हुकस्टेपवर ठेका धरत कार्यक्रमात उत्साह निर्माण केला. या गाण्याचे बोल सुशील राठोड, विनायक पवार आणि दिपक अंगेवार यांनी लिहिले असून संगीत नितीन सावंत आणि अंबरीश यांनी दिलं आहे. आनंद शिंदे, अंबरीश आणि वैशाली माडे यांनी हे गाणं गायले आहे.
‘मन पाखरू’पासून ‘शांताबाई’पर्यंत गाण्यांची रंगली चर्चा
चित्रपटातील ‘मन पाखरू’ हे भावनिक गाणं गुरु ठाकूर यांनी लिहिलं असून संगीत नितीन सावंत यांनी दिलं आहे. अजय गोगावले यांच्या आवाजामुळे या गाण्याला विशेष भावनिक बाज मिळाली आहे.
तर गौतमी पाटीलवर चित्रित झालेलं ‘छम्मो’ हे गाणंही चर्चेचा विषय ठरलं. सखील आझमी लिखित या गाण्याला सिद्धार्थ कश्यप यांनी संगीत दिलं असून साक्षी होळकर आणि राजा हसन यांनी ते गायले आहे.
याशिवाय ‘कती तू बंजारा’ आणि सनी लिओनीवर चित्रित झालेलं ‘शांताबाई’ हे गाणंही विशेष चर्चेत राहिलं.
दमदार कलाकारांच्या उपस्थितीने रंगला सोहळा
या संगीत अनावरण सोहळ्याला उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, सयाजी शिंदे, नागेश भोसले, गौतमी पाटील आणि सपना चौधरी यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
दिग्दर्शक आणि निर्माते संजीवकुमार राठोड यांनी चित्रपटाच्या सामाजिक आशयाविषयी माहिती दिली, तर उषा नाडकर्णी यांनी आपल्या भूमिकेबद्दल बोलताना चित्रपटातील वास्तववादी मांडणीचं कौतुक केलं.
२९ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला
सामाजिक वास्तव, भ्रष्ट व्यवस्थेविरोधातील संघर्ष आणि भावनिक आशय असलेली गाणी यामुळे ‘द महाराष्ट्र फाईल्स’बद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या २९ मे २०२६ रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
