‘प्रत्येक रंगाची एक किंमत आहे!’ ZEE5 ने लॉन्च केला ‘सतरंगी – बदले का खेल’चा दमदार ट्रेलर

हिंदी ZEE5 वर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेली ‘सतरंगी – बदले का खेल’ ही वेब मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. अंशुमन पुष्कर, कुमुद मिश्रा आणि महवश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, ग्रामीण उत्तर प्रदेशच्या सरंजामी राजकारण, सूड आणि सत्तासंघर्षाची थरारक झलक यात पाहायला मिळत आहे. जय बसंतू सिंह दिग्दर्शित आणि आरएनडी फिल्म एलएलपी निर्मित ही मालिका २२ मे रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.

बबलू महतोच्या दुहेरी आयुष्याची कथा

‘सतरंगी – बदले का खेल’मध्ये बबलू महतो ही व्यक्तिरेखा केंद्रस्थानी आहे. लौंडा नाच कलाकाराचा मुलगा म्हणून अपमान आणि दुर्लक्ष सहन करत वाढलेल्या बबलूला समाजात टिकून राहण्यासाठी वेगळाच मार्ग स्वीकारावा लागतो. जात, सत्ता आणि प्रतिष्ठेने विभागलेल्या जगात तो ‘बबलू’ आणि ‘लल्ली’ अशा दुहेरी ओळखीत जगताना दिसतो.

दोन प्रभावशाली कुटुंबांमधील संघर्ष, सत्ता मिळवण्यासाठीचे डावपेच आणि सूडातून सुरू झालेली मोठी लढाई ही मालिकेची मुख्य बाज ठरणार आहे.

लौंडा नाच परंपरेचा वेगळा संदर्भ

या मालिकेची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ‘लौंडा नाच’ या पारंपरिक उत्तर भारतीय लोककलेची पार्श्वभूमी. ग्रामीण भागात पुरुष कलाकार महिलांचे वेश परिधान करून सादरीकरण करतात, त्या लोककलेला या मालिकेतून वेगळ्या आणि संवेदनशील दृष्टिकोनातून मांडण्यात आलं आहे.

ही केवळ सादरीकरणाची कला नसून ओळख, पुरुषत्व, प्रतिष्ठा आणि अस्तित्वाचा संघर्ष दाखवणारा महत्त्वाचा भाग असल्याचं मालिकेतून दिसून येतं.

सूड, सत्ता आणि मानसिक खेळ

दिग्दर्शक जय बसंतू सिंह यांच्या मते, ही कथा फक्त सूडाची नाही तर व्यवस्थेमध्ये राहून ती मोडण्याची आहे. बबलूची दुहेरी ओळख त्याला समाजातील वेगवेगळ्या स्तरांमध्ये प्रवेश मिळवून देते आणि तिथूनच त्याच्या खेळाची खरी सुरुवात होते.

अभिनेता अंशुमन पुष्कर म्हणतो की, बबलू हा बाहेरून दुर्लक्षित वाटणारा पण आतून अत्यंत बुद्धिमान आणि परिस्थिती समजून घेणारा माणूस आहे. त्याचं दुहेरी आयुष्यच त्याची सर्वात मोठी ताकद ठरतं.

२२ मेपासून ZEE5 वर

ग्रामीण राजकारण, सूड, सत्ता, भावनिक संघर्ष आणि सामाजिक वास्तव यांचा संगम असलेली ‘सतरंगी – बदले का खेल’ ही मालिका २२ मे २०२६ पासून ZEE5 वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a comment