१४ वर्षांनंतर पुन्हा परतले शेखर सुमन; ‘शेखर टुनाइट’मधून पुन्हा अनुभवायला मिळणार संवादांची जादू

भारतीय मनोरंजनविश्वात संवाद, विनोद आणि खास शैलीमुळे वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते आणि सूत्रसंचालक शेखर सुमन तब्बल १४ वर्षांनंतर पुन्हा एकदा नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘शेखर टुनाइट’ या नव्या शोमधून ते पुन्हा संवादांची जादू अनुभवायला देणार असून, या शोचा फर्स्ट लूक आणि ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

आजच्या डिजिटल युगात बहुतांश संवाद हे आधीच ठरवलेले किंवा फक्त व्हायरल होण्यासाठी तयार केलेले असतात. मात्र ‘शेखर टुनाइट’मध्ये प्रेक्षकांना खरे, मनापासून आणि नैसर्गिक संवाद अनुभवायला मिळणार आहेत. या शोमध्ये मुलाखतींपेक्षा व्यक्तींमधील भावना, अचानक उमटणारा हशा आणि कॅमेऱ्याचं भान विसरून होणाऱ्या गप्पांना अधिक महत्त्व दिलं जाणार आहे.

जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा

मोठ्या आउटडोअर कॅम्पेन आणि डिजिटल लॉन्चद्वारे या शोची घोषणा करण्यात आली. त्यामुळे शेखर सुमन यांना पाहत मोठं झालेल्या प्रेक्षकांच्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. पॉडकास्ट आणि डिजिटल टॉक शो लोकप्रिय होण्याच्या खूप आधी शेखर सुमन यांनी भारतीय टेलिव्हिजनवर संवादाची वेगळी शैली निर्माण केली होती. त्यांची विनोदबुद्धी, उपरोध आणि सहज संवाद साधण्याची कला आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

हा शो संगानी ब्रदर्स आणि कॉबल्ड स्ट्रीट यांच्या बॅनरखाली तयार करण्यात आला असून, पूर्णपणे अनस्क्रिप्टेड आणि नैसर्गिक संवादांवर आधारित आहे.

‘हा फक्त इंटरव्ह्यू शो नाही’ — शेखर सुमन

आपल्या पुनरागमनाबद्दल बोलताना शेखर सुमन म्हणाले की, “माझ्यासाठी ‘शेखर टुनाइट’ हा फक्त सेलिब्रिटी इंटरव्ह्यू शो नाही. हा खऱ्या भावना आणि नैसर्गिक संवादांचा प्रवास आहे. आपल्याला कायम लक्षात राहतात ते अचानक आलेले हसू, शांत क्षण आणि लोक जेव्हा स्वतःसारखे वागतात ते क्षण. मला नेहमी वाटतं की सगळ्यात सुंदर संवाद तेव्हाच होतात जेव्हा लोक कॅमेऱ्याचं भान विसरतात.”

अध्ययन सुमनसाठी खास भावनिक प्रवास

हा शो तयार करणारे अध्ययन सुमन म्हणाले की, “हा शो माझ्यासाठी अत्यंत खास आणि भावनिक प्रवास आहे. हा केवळ एका शोचं पुनरागमन नाही, तर एका काळाचा आणि एका आवाजाचा पुनर्जन्म आहे. लहानपणापासून मी बाबांची संवादशैली आणि त्यांची जादू जवळून पाहिली आहे. इतक्या वर्षांनंतर त्यांना पुन्हा त्याच आत्मविश्वासाने पाहणं खूप आनंददायी आहे.”

त्यांनी निर्माता धर्मेश संघानी आणि संपूर्ण टीमचेही विशेष आभार मानले.

चित्रपट, राजकारण, संगीत आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार

‘शेखर टुनाइट’मध्ये चित्रपट, राजकारण, संगीत, क्रीडा, व्यवसाय आणि संस्कृती क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी होणार आहेत. विनोद, भावना, उपरोध आणि मनमोकळ्या संवादांचा संगम असलेला हा शो डिजिटल प्रेक्षकांसाठी खास तयार करण्यात आला आहे.

आजच्या कृत्रिम आणि स्क्रिप्टेड संवादांच्या काळात, प्रामाणिक आणि मनापासून होणाऱ्या गप्पांचा अनुभव देणारा ‘शेखर टुनाइट’ प्रेक्षकांसाठी वेगळा ठरणार आहे.

Leave a comment