मराठी मालिकांमधील नायिकांच्या भूमिका अनेकदा ठरावीक चौकटीत अडकलेल्या दिसतात. मात्र आता झी मराठीवरील ‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेत प्रेक्षकांना एक वेगळं वळण पाहायला मिळणार आहे. मालिकेतील स्वानंदी म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने नुकताच एक खास ‘ड्रंक सीन’ शूट केला असून, त्यामागचा अनुभव तिने अत्यंत मोकळेपणाने शेअर केला आहे.

‘नायिकेची प्रतिमा जपत हा सीन करणं मोठं आव्हान होतं’

या सीनबद्दल बोलताना तेजश्री म्हणाली की, कलाकार म्हणून अशा भूमिका साकारणं हे खूप आव्हानात्मक असतं. “जेव्हा तुम्ही नायिकेची भूमिका करता, तेव्हा तुमच्यावर एक वेगळी जबाबदारी असते. प्रेक्षकांच्या मनात त्या व्यक्तिरेखेची एक प्रतिमा तयार झालेली असते. त्यामुळे कोणताही सीन करताना त्या प्रतिमेचं भान ठेवणं खूप महत्त्वाचं असतं,” असं ती म्हणाली.
स्वानंदीच्या चौकटीबाहेर जाण्याची संधी
तेजश्रीच्या मते, हा सीन स्वानंदीच्या नेहमीच्या स्वभावापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. दारू प्यायल्यानंतर मिळणाऱ्या त्या तात्पुरत्या मोकळेपणातून स्वानंदी स्वतःला व्यक्त करताना दिसणार आहे. “स्वानंदीसाठी असा सीन लिहिला गेला आहे हे समजल्यावर मला खूप आनंद झाला. कारण नायिकांच्या वाट्याला अनेकदा साचेबद्ध गोष्टीच येतात. पण या निमित्ताने काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळाली,” असं ती सांगते.
‘माझे ड्रिंक करणारे मित्रच माझं इन्स्पिरेशन’

खऱ्या आयुष्यात आपण ड्रिंक करत नसल्याचं सांगताना तेजश्री म्हणाली की, “मित्रमंडळींसोबत बाहेर गेल्यावर मी त्यांची ड्रायव्हर बनते. त्यामुळे त्यांचं निरीक्षण करण्याची मला संधी मिळते. ते कसे बोलतात, कसे वागतात हे मी बारकाईने पाहत असते. अशा सीन्ससाठी तेच माझं इन्स्पिरेशन ठरतात.”
ती पुढे म्हणाली की, यापूर्वीही एका मराठी चित्रपटात तिने अशाच प्रकारचा सीन केला होता आणि त्या भूमिकेसाठी तिला पुरस्कारही मिळाला होता.
‘स्वानंदीचा भाबडेपणा कायम ठेवणं महत्त्वाचं होतं’

या सीनमध्ये स्वानंदीच्या मूळ स्वभावाला धक्का लागू नये, याची विशेष काळजी घेण्यात आल्याचं तेजश्रीने स्पष्ट केलं. “प्रेक्षक ज्या स्वानंदीवर प्रेम करतात, तिचा भाबडेपणा कुठेही कमी होऊ नये याचं भान लेखक आणि दिग्दर्शकांनी खूप छान ठेवलं आहे,” असं ती म्हणाली.
‘टिपिकल रडणारी नायिका नाही’
स्वानंदीच्या व्यक्तिरेखेची एक खास गोष्ट म्हणजे तिला टिपिकल रडणारी नायिका दाखवलेलं नाही, असं तेजश्री सांगते. “तिच्यासोबत काही घडलं तर ती प्रश्न विचारते. स्वतःची मतं मांडते. या ‘ड्रंक सीन’मुळे तिला जिथे एरवी व्यक्त होता आलं नसतं, तिथे मोकळेपणाने बोलण्याची संधी मिळाली,” असं ती म्हणाली.
प्रेक्षकांना पाहायला मिळणार स्वानंदीचं वेगळं रूप
या खास प्रसंगामुळे मालिकेत भावनिक आणि मनोरंजक वळण येणार असून, स्वानंदीचं हे वेगळं रूप प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी अपेक्षा तेजश्री प्रधानने व्यक्त केली आहे.
पहा ‘वीण दोघातली ही तुटेना’ दररोज संध्याकाळी ७.१५ वा. फक्त झी मराठीवर.
