
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगळ्या आणि मनोरंजक कथानकांवर आधारित चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच आता पारंपरिक लग्न पद्धतीला आधुनिक विचारांची जोड देणारा ‘कप बशी’ हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला असून, त्यामधून एक वेगळी आणि खुसखुशीत कौटुंबिक कथा पाहायला मिळणार असल्याची झलक समोर आली आहे. येत्या १९ जून रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
अनोख्या अटीवर आधारित भन्नाट कथा

भारतीय विवाह पद्धतीत मुलगा आणि मुलगी यांच्या पत्रिका जुळवण्याची परंपरा आजही अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. मात्र ‘कप बशी’मध्ये या पारंपरिक विचारांना एक भन्नाट ट्विस्ट देण्यात आला आहे. लग्नासाठी होकार देण्याआधी नवरी मुलगी आपल्या होणाऱ्या सासूसमोर एक वेगळीच अट ठेवते — सासू आणि सुनेची पत्रिका जुळली पाहिजे! या अटीमुळे निर्माण होणारा गोंधळ, विनोदी प्रसंग आणि कौटुंबिक नात्यांमधील रंगतदार घडामोडी चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.
टीजरमधून वाढली उत्सुकता

चित्रपटाचा टीजर प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर घालणारा ठरत आहे. हलक्याफुलक्या शैलीत मांडलेली कथा, खुसखुशीत संवाद आणि कौटुंबिक मनोरंजनाचा बाज यामुळे टीजरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवी जोडी या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र झळकणार असून, त्यांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.
तगडी कलाकारांची फळी
‘कप बशी’मध्ये अभिनेत्री निर्मिती सावंत, पूजा सावंत, ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, आनंद इंगळे, आनंद काळे, चिन्मय शिंत्रे आणि उमा सरदेशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनुभवी कलाकारांसोबत नव्या कलाकारांचीही दमदार साथ या चित्रपटाला लाभली आहे.
तांत्रिक बाजूही ठरणार खास
सुकल्प चित्र निर्मित या चित्रपटाचे निर्माते कल्पक सदानंद जोशी आहेत. बिग ब्रेन प्रॉडक्शन्सचे निलेश रामगोपाल राठी यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चेतन सैंदाणे यांनी पटकथा आणि संवाद लिहिले असून दिग्दर्शनाची धुरा वैभव रामकृष्ण चिंचाळकर यांनी सांभाळली आहे.
विशेष म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीला प्रथमच ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांचे संगीत या चित्रपटाच्या निमित्ताने लाभले आहे. गीतलेखन गुरु ठाकूर यांनी केले असून छायांकन बाळू दहिफळे यांनी केले आहे. संकलन आशिष म्हात्रे, ध्वनी संयोजन राष्ट्रीय पुरस्कार विजेते मंदार कमलापूरकर, तर लूक डिझायनर म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्रीकांत देसाई यांनी काम पाहिले आहे. नृत्य दिग्दर्शन दीपाली विचारे, कला दिग्दर्शन महेश कुडाळकर आणि प्रोजेक्ट हेड म्हणून चिन्मय शिंत्रे यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
मनोरंजनासोबत नात्यांवर हलकंफुलकं भाष्य
आजच्या आधुनिक काळातही परंपरा, पत्रिका आणि लग्न जुळवण्याच्या संकल्पना समाजात महत्त्वाच्या मानल्या जातात. त्याच विषयावर हलक्याफुलक्या पद्धतीने भाष्य करत ‘कप बशी’ हा चित्रपट कौटुंबिक मनोरंजनाची मेजवानी घेऊन येणार आहे. विनोद, नाती आणि आधुनिक विचारांची सांगड घालणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे.
