नव्या दमाच्या कलाकारांसह रंगणार ‘जोडीचा मामला’

मराठी रंगभूमी सध्या नव्या विचारांनी, तरुण ऊर्जेने आणि समकालीन विषयांनी समृद्ध होताना दिसत आहे. बदलत्या काळानुसार नातेसंबंध, सामाजिक वास्तव आणि आजच्या पिढीच्या भावविश्वावर आधारित नवे प्रयोग रंगभूमीवर पाहायला मिळत आहेत. जुन्या-जाणत्या कलाकारांसोबत नव्या कलाकारांनाही व्यासपीठ मिळत असून, त्यातून मराठी नाटकांना एक वेगळीच ताजेपणाची झळाळी प्राप्त होत आहे. अशाच नव्या दमाच्या कलाकारांना घेऊन ‘दृष्टी’ आणि ‘अद्वैत थिएटर्स’ निर्मित ‘जोडीचा मामला’ हे दोन अंकी विनोदी नाटक आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

पत्रकार परिषदेत सचिन पिळगांवकरांची उपस्थिती

या नाटकाची पत्रकार परिषद नुकतीच उत्साहात पार पडली. या वेळी प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता सचिन पिळगांवकर यांनी विशेष उपस्थिती लावत नाटकाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. नव्या कलाकारांच्या सहभागामुळे मराठी रंगभूमीला नवी ऊर्जा मिळेल आणि हा बदल नाट्यव्यवसायासाठी अत्यंत सकारात्मक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

‘Black & White कुटुंबाची सप्तरंगी गोष्ट!’

‘जोडीचा मामला’ या नाटकाची टॅगलाईनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारी आहे — ‘Black & White कुटुंबाची सप्तरंगी गोष्ट!’ आजच्या तरुणाईचा आत्मकेंद्रित दृष्टिकोन, बदलती सामाजिक मानसिकता आणि त्याचा कुटुंबावर होणारा परिणाम यावर हे नाटक उपरोधिक आणि विनोदी शैलीत भाष्य करतं. मनोरंजनासोबतच विचार करायला भाग पाडणारा हा रंगमंचीय प्रयोग असल्याचं सांगितलं जात आहे.

राहुल भंडारे आणि श्रेयस इंदापूरकर यांची नवी संकल्पना

निर्माते राहुल भंडारे म्हणाले, “आजच्या तरुण पिढीचे विचार, त्यांच्या नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि कुटुंबातील बदलती समीकरणं यावर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करणारे नाटक प्रेक्षकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. नव्या कलाकारांना व्यासपीठ देत दर्जेदार मनोरंजन सादर करण्याचा प्रयत्न प्रेक्षकांना नक्की आवडेल.”

दिग्दर्शक श्रेयस इंदापूरकर म्हणाले, “‘जोडीचा मामला’ करताना आम्ही विनोदाच्या माध्यमातून आजच्या समाजातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक पात्र प्रेक्षकांना कुठे ना कुठे स्वतःशी जोडून घेईल. मनोरंजनासोबत विचार करायला भाग पाडणारं हे नाटक प्रत्येक वयोगटाला भावेल.”

दमदार कलाकारांची फळी

या नाटकात योगेश कदम, प्राची कात्रे, पायल साळुंके, वैभव महाले, विशाल दुराफे, अश्विनी माळी, विनायक जाधव, प्रदीप कसबे, श्वेता काजळे, अभिजीत पाटसकर, आकाश राठोड, दुर्गेश लांडगे आणि श्रेयस इंदापूरकर हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

नाटकाचे लेखन आणि संगीत चैतन्य कुलकर्णी यांचे असून दिग्दर्शन श्रेयस इंदापूरकर यांनी केले आहे. निर्मिती राहुल भंडारे आणि श्रेयस इंदापूरकर यांनी केली आहे. नेपथ्य संदेश बेद्रे, प्रकाशयोजना शीतल तळपदे, नृत्यदिग्दर्शन ऋषीकेश देसाई यांनी सांभाळले आहे. तसेच अवधूत गुप्ते, श्रद्धा आपटे-केळकर आणि युगंधर देशमुख यांच्या आवाजाने नाटकातील गाण्यांना विशेष रंग चढला आहे. रंगभूषा उलेश कंधारे तर वेशभूषा प्राची कात्रे आणि श्रद्धा हांडे यांनी केली आहे.

प्रयोगांचे वेळापत्रक

‘जोडीचा मामला’चा शुभारंभ प्रयोग शुक्रवार १५ मे रोजी दुपारी ४.३० वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे रंगणार आहे. त्यानंतर शनिवार १६ मे रोजी रात्री ८.३० वाजता आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण, रविवार १७ मे रोजी दुपारी १२ वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी, मंगळवार १९ मे रोजी दुपारी ४ वाजता शिवाजी मंदिर, दादर आणि रविवार ३१ मे रोजी दुपारी ४ वाजता यशवंत नाट्यगृह, माटुंगा येथे प्रयोग होणार आहेत.

Leave a comment