कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये ‘अभिजात मराठी OTT’चे जागतिक लाँच

भारत पॅव्हेलियनमध्ये मराठी OTT चे जागतिक स्तरावर दमदार प्रतिनिधित्व
मराठी सिनेमा, संस्कृती आणि डिजिटल कथाकथनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जाणारा *‘अभिजात मराठी OTT’*चा जागतिक लाँच सोहळा १६ मे २०२६ रोजी कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील भारत पॅव्हेलियन येथे पार पडणार आहे. मराठी मनोरंजनविश्वासाठी हा ऐतिहासिक क्षण मानला जात असून, जागतिक स्तरावर मराठी डिजिटल कंटेंटला नवी ओळख मिळवून देण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
मराठी सिनेविश्वातील मान्यवरांची उपस्थिती
या विशेष लाँच कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता सराफ, प्राजक्ता माळी, अंकिता वालावलकर, जयंती वाघधरे तसेच अभिजात मराठी OTT चे संस्थापक केदार जोशी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, अभिजात मराठी OTT चं अधिकृत रेड कार्पेट प्रतिनिधित्व अशोक सराफ यांच्या नेतृत्वाखाली होणार असून, मराठी सिनेमा आणि संस्कृतीचा जागतिक स्तरावर गौरव केला जाणार आहे.
जागतिक स्तरावर मराठी कथाकथनाची चर्चा
लाँच कार्यक्रमानंतर चित्रपटसृष्टीतील मान्यवर, निर्माते, सांस्कृतिक प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय पाहुण्यांच्या उपस्थितीत विशेष नेटवर्किंग डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर मराठी आणि प्रादेशिक कंटेंटची वाढती जागतिक ओळख, भारतीय प्रादेशिक सिनेमासाठी निर्माण होणाऱ्या नव्या संधी आणि डिजिटल कथाकथनाच्या बदलत्या स्वरूपावर विशेष पॅनेल चर्चाही आयोजित करण्यात येणार आहे.
केवळ OTT नव्हे, तर मराठी डिजिटल विश्व
‘अभिजात मराठी’ हे फक्त एक OTT प्लॅटफॉर्म नसून मराठी सिनेमा, भक्ती, लाईफस्टाईल, इन्फोटेन्मेंट आणि AI-आधारित आधुनिक कथाकथनाचं व्यापक डिजिटल विश्व म्हणून विकसित करण्यात येत आहे. मराठी भाषेतील दर्जेदार आणि जागतिक दर्जाच्या कंटेंटला एकाच व्यासपीठावर आणण्याचा या प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे.
अभिजात भाषेच्या दर्जातून जन्मलेली प्रेरणा
२०२४ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’ दर्जा जाहीर केल्यानंतर या OTT प्लॅटफॉर्मची संकल्पना आकाराला आली. हा निर्णय जगभरातील मराठी भाषिकांसाठी अभिमानाचा क्षण ठरला होता.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी संस्कृती आणि डिजिटल क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठी विविध उपक्रमांना चालना दिली.
मराठी भाषा विभागाचे योगदान
मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मराठी भाषा, साहित्य, सिनेमा आणि डिजिटल कथाकथनाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या पुढाकारातून निर्माण झालेलं सकारात्मक वातावरण हे या नव्या डिजिटल चळवळीचं एक महत्त्वाचं आधारस्थान मानलं जात आहे.
Suman Entertainment and Media Pvt. Ltd. चे बौद्धिक स्वामित्व
‘अभिजात मराठी OTT’ हे Suman Entertainment and Media Pvt. Ltd. चे बौद्धिक स्वामित्व असून, जागतिक स्तरावर मराठी कंटेंटला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

Leave a comment