‘देऊळ बंद २’ चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज; आता होणार थेट ‘देवाची परीक्षा’!

शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवरून देवालाच आव्हान; प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद २’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज!

२०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवणाऱ्या ‘देऊळ बंद’ चित्रपटानंतर प्रेक्षक ज्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. ‘वटवृक्ष एण्टरटेन्मेंट’ निर्मित आणि प्रविण विठ्ठल तरडे लिखित-दिग्दर्शित ‘देऊळ बंद २’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा थरारक, भावनिक आणि डोळ्यात अंजन घालणारा अधिकृत ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. “आता परीक्षा देवाची…” या उत्कंठावर्धक टॅगलाईनसह येणारा हा चित्रपट २१ मे २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

श्रद्धा, वास्तव आणि संघर्षाची प्रभावी मांडणी

‘देऊळ बंद २’ चे कथानक सामाजिक वास्तव, श्रद्धा आणि मानवी संघर्ष याभोवती फिरताना दिसते. ट्रेलरमध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक संकट, आत्महत्या आणि ग्रामीण भागातील विदारक वास्तव अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अध्यात्म यांच्यातील संघर्षासोबतच देवाचे अस्तित्व, श्रद्धा आणि सामाजिक उत्तरदायित्व यावरही चित्रपट भाष्य करताना दिसतो.

मनाला भिडणारे संवाद

ट्रेलरची सुरुवातच एका आव्हानात्मक प्रसंगाने होते, जिथे स्वामी समर्थांच्या अस्तित्वालाच प्रश्न विचारले जातात. “या देशात सगळं ओरिजनल आहे, डुप्लिकेट फक्त शेतकरी!” तसेच “रोज एक तरी आत्महत्या होणाऱ्या आमच्या या तालुक्यात पुढच्या आठ दिवसांत एकही आत्महत्या झाली नाही पाहिजे… जर झाली तर माझं देऊळ बंद कायमचं!” असे संवाद थेट मनाला भिडतात आणि चित्रपटाचा मुख्य आशय अधोरेखित करतात.

मोहन जोशी पुन्हा स्वामी समर्थांच्या भूमिकेत

चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केले आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या दैवी भूमिकेत दिसणार असून त्यांच्यासोबत स्नेहल तरडे आणि स्वतः प्रविण तरडे महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. प्रविण तरडे ‘सदूशेठ’ या प्रभावी व्यक्तिरेखेत दिसणार आहेत.

भव्य निर्मिती आणि सामाजिक प्रबोधनाचा मिलाफ

कैलास वाणी, सौ. जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ग्रामीण भागाचे वास्तववादी चित्रीकरण, प्रभावी पार्श्वसंगीत आणि श्रद्धेच्या पार्श्वभूमीवर उभा राहणारा सामाजिक प्रश्न यामुळे ‘देऊळ बंद २’ प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे. स्वामी भक्ती आणि सामाजिक प्रबोधन यांचा अनोखा संगम असलेला हा चित्रपट कौटुंबिक प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.

Leave a comment