
“आता सगळं उघड होणार…!” टॅगलाईनमुळे चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता
समाजात घडणाऱ्या धक्कादायक घटनांवर आणि गाजलेल्या प्रकरणांवर आधारित चित्रपट नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. वास्तववादी मांडणी आणि समाजातील लपलेल्या बाजूंवर प्रकाश टाकणाऱ्या अशाच एका आगामी मराठी चित्रपटाची आता घोषणा करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून, त्यानंतर चित्रपटाबद्दलची चर्चा जोर धरताना दिसत आहे.
२ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार प्रदर्शित
मोशन पोस्टरद्वारे करण्यात आलेल्या घोषणेनुसार ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. जैन फिल्म प्रोडक्शन आणि मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती देवेंद्र भट, सुर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे यांनी केली आहे. वास्तवाशी जवळीक साधणाऱ्या कथानकामुळे हा चित्रपट सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरत आहे.
मोशन पोस्टरमधून मिळाले अनेक संकेत
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एक पाठमोरी व्यक्ती दिसते. कुर्ता-पायजमा आणि जॅकेट परिधान केलेल्या या व्यक्तीच्या हातात पाचशे रुपयांच्या नोटांची बंडल्स आहेत. त्याच्या सभोवती क्राईम सीनच्या पिवळ्या फिती दिसतात. समोरील भिंतीवर काही फोटो आणि ‘नाशिक’, ‘भोंदूबाबा’ अशी शब्दरचना दिसते. टेबलावर तांब्याचा जग, पुस्तके, चहाचा ग्लास आणि इतर वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व गोष्टींमधून एका गाजलेल्या प्रकरणाचा संदर्भ दिल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
“आता सगळं उघड होणार…”
चित्रपटाची “आता सगळं उघड होणार…!” ही टॅगलाईन सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहे. ही कथा नेमकी कोणत्या घटनांवर आधारित आहे, कोणाचा पर्दाफाश होणार आहे आणि कोणत्या ‘फाईल्स’ उघड केल्या जाणार आहेत, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
दिग्दर्शक स्वरूप बी. सावंत यांचे धाडसी पाऊल
या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वरूप बी. सावंत यांनी केले असून, वास्तवदर्शी विषय हाताळत त्यांनी एक धाडसी प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाची कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहिली असून पटकथा आणि संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे.
कलाकारांची नावे अद्याप गुप्त
विशेष म्हणजे चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. निर्मात्यांनी कथानक आणि स्टारकास्टबाबत सध्या गुप्तता राखली असून, लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तांत्रिक बाजूही मजबूत
या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफी आकाश काकडे करणार असून कला दिग्दर्शन अक्षय आंबेकर यांनी सांभाळले आहे. वेशभूषा आकांक्षा गांधी यांची असून, सचिन घणवंत प्रोडक्शन हेड तर नेहा घोडके प्रॉडक्शन कंट्रोलर म्हणून काम पाहणार आहेत.
मोशन पोस्टरमधून मिळालेल्या संकेतांमुळे ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हा चित्रपट आता मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आगामी प्रोजेक्ट्सपैकी एक ठरताना दिसत आहे.
