
मुंबई: NH Studioz ने ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे दूरदर्शनवरील प्रक्षेपणाचे हक्क मिळवले आहेत. यामुळे भारताचा हा अत्यंत लोकप्रिय क्विझ शो दूरदर्शनच्या प्राईम-टाइम लाईन-अपमध्ये रोज रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या निर्णयामुळे दूरदर्शनच्या मनोरंजन क्षेत्रातील स्थान आणखी मजबूत होईल आणि देशभरातील कोट्यवधी प्रेक्षकांमध्ये या शोचे सदाबहार आकर्षण पुन्हा निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.
महानायक अमिताभ बच्चन यांनी होस्ट केलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोने भारतीय टेलिव्हिजनला एक नवी ओळख दिली आणि पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनात घर करून तो एक सांस्कृतिक उत्सव बनला. या भागीदारीच्या माध्यमातून, दूरदर्शनच्या शहरी आणि ग्रामीण भागातील अफाट पोहोचचा वापर करून हा शो जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा NH Studioz चा मानस आहे.
भारतीय प्रेक्षकांमध्ये सध्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा (नॉस्टॅल्जिया) आणि संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहण्याचा कंटेंट पुन्हा एकदा लोकप्रिय होत असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी कोविड काळातही उद्योग समीक्षकांनी असाच अनुभव घेतला होता, जेव्हा दूरदर्शनवर ‘महाभारत’च्या पुनक्षेपणाने रेकॉर्डब्रेक व्ह्यूअरशिप मिळवली होती आणि भारतातील टेलिव्हिजन पाहण्याचे गणितच बदलून टाकले होते.
“आमचा ठाम विश्वास आहे कि सदाबहार कंटेंट कोणत्याही पिढीचा किंवा प्लॅटफॉर्मचा असला, तरी तो आपले नवीन प्रेक्षक शोधून घेतोच,” असे NH Studioz चे चेअरमन श्री. नरेंद्र हिरावत यांनी म्हटले. “कौन बनेगा करोडपती हा केवळ एक टेलिव्हिजन शो नसून ती एक भावना आहे, ज्याच्याशी संपूर्ण भारतातील प्रेक्षक वर्षानुवर्षे जोडलेले आहेत. हा शो दूरदर्शनच्या प्राईम-टाइम बँडवर आणल्यामुळे जुन्या प्रेक्षकांना तो अनुभव पुन्हा जगण्याची संधी मिळेल, तर नवीन प्रेक्षकांना या अप्रतिम फॉरमॅटची जादू अनुभवता येईल.”
दूरदर्शनची देशातील सर्वात व्यापक पोहोच लक्षात घेता, ‘केबीसी’ (KBC) च्या समावेशामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन तर होईलच, सोबतच प्राईम-टाइम सेगमेंटमध्ये दूरदर्शनच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांची बाजू अधिक भक्कम होईल. हे संपादन टेलिव्हिजन आणि डिजिटल क्षेत्रात आयकॉनिक मनोरंजन प्रॉपर्टीज पुनरुज्जीवित करण्यावर NH Studioz चा वाढता भर दर्शवते, ज्यामुळे भारतातील लोकप्रिय फॉरमॅट्सची पोहोच आणि आयुष्य अधिक वाढवता येईल.
