भास आणि सत्य यांमधील अंतर उलगडणाऱ्या ‘दृश्य-अदृश्य’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित; १९ जूनला होणार प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत रहस्यपटांची समृद्ध परंपरा आहे आणि त्या परंपरेला पुढे नेणारा आणखी एक महत्त्वाकांक्षी चित्रपट म्हणजे ‘दृश्य-अदृश्य’. ५६व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात (IFFI) कौतुकाची थाप मिळवलेल्या या चित्रपटाचा थरारक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, येत्या १९ जून २०२६ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

आरएसटी कॅनव्हास प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती प्रद्योत पेंढारकर, अनिल वर्खडे, दत्ताजी थोरात, धनंजय थोरात, पृथ्वीराज खेडकर, युवराज खेडकर आणि अश्विनी खेडकर यांनी केली आहे. ‘कुरुक्षेत्र’, ‘बंदीशाळा’ आणि ‘एबी अँड सीडी’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक मिलिंद लेले यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून कथा आणि पटकथाही त्यांनीच लिहिली आहे. संवाद लेखन अस्मिता कुलकर्णी यांनी केले आहे.

रहस्य, संशय आणि गूढतेची पकड

ट्रेलरची सुरुवात रोहित या पात्राला २५ लाख रुपयांचे इन्सेन्टिव्ह मिळणार असल्याच्या प्रसंगाने होते. मात्र हे इन्सेन्टिव्ह नेमके कशासाठी आहे, याची माहिती त्याची पत्नी तन्वीलाही नसते. त्यानंतर अचानक त्यांच्या लहान मुलगी इशा बेपत्ता होते आणि कथानकाला धक्कादायक वळण मिळते.

इशाच्या शोधासाठी पोलिस तपास सुरू होतो. मात्र तपास जसजसा पुढे सरकतो तसतसे अनेक गूढ प्रश्न उभे राहतात. हॉटेलमधील लोकांच्या मते तन्वी एकटीच आली होती. सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. साक्षीदारांच्या जबानी एकमेकांशी जुळत नाहीत. त्यातच तन्वीचा पती रोहित मृतावस्थेत सापडतो आणि संपूर्ण प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनते.

तन्वी सांगत असलेली कथा खरी आहे का? इशा खरंच अस्तित्वात होती का? रोहितचा खून कोणी केला? नेमकं कोण सत्य सांगतंय आणि कोण खोटं बोलतंय? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा रोमांचक प्रवास म्हणजे ‘दृश्य-अदृश्य’.

पूजा सावंतचा वेगळा अवतार

या चित्रपटात पूजा सावंत मुख्य भूमिकेत दिसणार असून तिने साकारलेली ‘तन्वी’ ही व्यक्तिरेखा तिच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. ट्रेलरमध्ये तिच्या अभिनयातील भावनिक संघर्ष, अस्वस्थता आणि गूढता प्रभावीपणे दिसून येते.

चित्रपटात तिच्यासोबत अशोक समर्थ, सुव्रत जोशी, हार्दिक जोशी, अक्षया गुरव, विद्याधर जोशी आणि केया इंगळे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

भक्कम तांत्रिक टीम

चित्रपटाचे छायांकन अमोल साळुंके यांनी केले असून संकलन सचिन वाघ यांचे आहे. रंगभूषा महेश बराटे यांनी तर वेशभूषा कीर्ती जंगम-जोशी यांनी केली आहे. गीतकार वलय मुळगुंद यांच्या गीतांना आशिष मुजुमदार आणि देवदत्त बाजी यांनी संगीत दिले आहे. प्रियांका बर्वे आणि निधी हेगडे यांच्या आवाजातील गाणी चित्रपटाच्या भावविश्वाला अधिक प्रभावी बनवणार आहेत.

ट्रेलरमधील रहस्य, थरार आणि मानसशास्त्रीय खेळी पाहता ‘दृश्य-अदृश्य’ हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा अनुभव देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जे दिसतं तेच खरं असतं का आणि दृश्यामागे दडलेलं अदृश्य सत्य नेमकं काय आहे, याचा उलगडा १९ जून रोजी मोठ्या पडद्यावर होणार आहे.

Leave a comment