
समर-स्वानंदीच्या प्रेमाला मिळणार नवं वळण, तर ‘सनई चौघडे’मध्ये संकटाची चाहूल

पावसाळ्याच्या आगमनासोबत महाराष्ट्रात सण-उत्सवांची चाहूल लागते. त्यातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा. विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी संसारासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. यंदा झी मराठीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ आणि ‘सनई चौघडे’ या मालिकांमध्येही वटपौर्णिमेचा सोहळा विशेष पद्धतीने रंगणार असून, प्रेम, भावना आणि अनपेक्षित घडामोडींची मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
समर करणार प्रेमाची कबुली?

‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत समर आणि स्वानंदीच्या नात्यात आता नवं वळण येणार आहे. समर स्वानंदीला मोकळ्या माळरानावर फिरायला घेऊन जातो आणि त्यानंतर एका प्लांट नर्सरीमध्ये तिच्यासाठी खास सरप्राईज ठेवतो. सुंदर फुलं आणि रोपांच्या मदतीने त्याने ‘I Love You’ असा संदेश तयार केलेला असतो. आपल्या मनातील भावना व्यक्त करत समर स्वानंदीच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत असतो.
दोघे मिळून वृक्षारोपणही करतात. मात्र स्वानंदीने अद्याप प्रेमाची कबुली दिलेली नसल्यामुळे समर तिला म्हणतो, “जर आपल्या नात्यात तसं काही नसेल, तर वटपौर्णिमेची पूजा करू नका.” त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी समर येणार की नाही, याची चिंता स्वानंदीला सतावत असते. पण तिला एक सुखद धक्का बसतो. समर आधीच वडाच्या झाडाजवळ उपस्थित राहून इतर महिलांसोबत पूजा करत असतो. या क्षणानंतर स्वानंदी आपल्या प्रेमाची कबुली देणार का? दोघांच्या नात्याची नवी सुरुवात होणार का? याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
पावसात शूटिंगचा अविस्मरणीय अनुभव – तेजश्री प्रधान

या विशेष भागाच्या चित्रीकरणाविषयी अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणाली, “प्रेक्षक ज्या प्रसंगाची आतुरतेने वाट पाहत होते, त्याच वेळी मुंबईत पहिला पाऊसही आला. त्यामुळे वटपौर्णिमेचा प्रसंग शूट करताना वातावरण अधिकच सुंदर झालं. गेले काही महिने प्रचंड उष्णतेत शूटिंग सुरू होतं. त्यामुळे पावसाचा गारवा कलाकारांसोबतच तंत्रज्ञांसाठीही खूप दिलासादायक होता.”
ती पुढे म्हणाली, “पावसात शूटिंग करताना चिखल, साड्या, इलेक्ट्रिकल उपकरणं अशा अनेक अडचणी असतात. पण यावेळी प्रत्येकजण पावसाचा आनंद घेत काम करत होता. समर आणि स्वानंदीच्या नात्याचा हा महत्त्वाचा टप्पा प्रेक्षकांच्या मनालाही नक्कीच भिडेल.”
‘सनई चौघडे’मध्ये वटपौर्णिमेसोबत संकटाची चाहूल

दुसरीकडे ‘सनई चौघडे’ मालिकेतही वटपौर्णिमेचा उत्सव आनंदात साजरा होताना दिसणार आहे. मात्र मालिकेच्या परंपरेप्रमाणे सणासुदीच्या वातावरणात एक मोठं संकटही येणार आहे. जय खानोलकर अडचणीत सापडणार असून, शर्वरी त्याला त्या संकटातून कशी बाहेर काढते, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
पावसाळ्यात शूटिंग म्हणजे मोठं आव्हान – जुई गोगरी
आसावरीची भूमिका साकारणारी जुई गोगरी म्हणाली, “पावसाळ्यात शूटिंग करणं खरंच खूप आव्हानात्मक असतं. वसईहून ठाण्याला सेटवर पोहोचण्यासाठी ट्रेन, कॅब आणि वाहतुकीच्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तरीही पावसात शूटिंग करण्याची एक वेगळीच मजा असते.”
ती पुढे म्हणाली, “पावसात रोमँटिक प्रसंग खूप सुंदर दिसतात, पण त्यामागे संपूर्ण टीमचे मोठे कष्ट असतात. मेकअप, केस, साड्या, इलेक्ट्रिकल उपकरणं आणि सततचा पाऊस यामध्ये प्रत्येक गोष्ट सांभाळावी लागते. आमच्या संपूर्ण टीमने एकमेकांची खूप काळजी घेतली. त्यामुळे हा अनुभव कायम लक्षात राहील.”
प्रेम, भावना आणि परंपरेचा सुंदर संगम

समर-स्वानंदी आणि आसावरी-गौतम यांच्या नात्यातील प्रेमळ क्षण, वटपौर्णिमेचा पारंपरिक सोहळा आणि पावसाळ्याची मनमोहक पार्श्वभूमी यामुळे झी मराठीवरील हे विशेष भाग प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहेत.
पाहायला विसरू नका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ दररोज सायंकाळी ७.३० वाजता आणि ‘सनई चौघडे’ रात्री ८.३० वाजता, फक्त झी मराठीवर.
