मनाला भिडणाऱ्या ‘तुला पाहता’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच

१९७१ आणि २०२६ मधील दोन प्रेमकहाण्यांचा भावस्पर्शी प्रवास १० जुलैपासून मोठ्या पडद्यावर

आजवर अनेक प्रेमकथा पडद्यावर आल्या, मात्र ‘तुला पाहता’ हा चित्रपट एका नव्हे तर दोन वेगवेगळ्या काळातील प्रेमकहाण्या एकाच कथेतून उलगडणार आहे. १९७१ आणि २०२६ या दोन कालखंडांतील दोन प्रेमप्रवास प्रेक्षकांना या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर मुंबईमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते मुश्ताफ खान यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात प्रदर्शित करण्यात आला. या सोहळ्याला सिनेपोलिसचे हेड ऑफ डिपार्टमेंट – प्रोग्रामिंग अँड डिस्ट्रिब्युशन मयांक श्रॉफ, अभिनेते सुशांत शेलार आणि चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

१० जुलैला मराठी आणि हिंदी भाषेत जागतिक प्रदर्शित

ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्सच्या मयुरा प्रधान यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे. पहिल्याच चित्रपटात निर्माती, लेखिका आणि दिग्दर्शिका अशा तिहेरी भूमिकेत त्यांनी काम केले आहे. १० जुलै रोजी हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषांमध्ये जगभर प्रदर्शित होणार आहे.

तगडी तांत्रिक बाजू आणि दमदार कलाकारांची फळी

चित्रपटाचे छायांकन पुष्कर झोटिंग, ध्वनिआरेखन रोहित प्रधान, संगीत दिग्दर्शन रोहन प्रधान आणि रोहन गोखले, तर नृत्य दिग्दर्शन दीपाली विचारे यांनी केले आहे.

चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर, ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे यांच्यासह नचिकेत लेले, मानसी पाटील, निशिगंधा वाड, आनंद काळे, दीपाली विचारे, पल्लवी अजय, स्वप्नील परजाणे आणि आकाश शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नव्या आणि अनुभवी कलाकारांच्या अभिनयाचा सुरेख संगम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

‘चित्रपटाचा ट्रेलर मनाला भावणारा’ – मुश्ताफ खान

ट्रेलर लाँच सोहळ्यात बोलताना अभिनेते मुश्ताफ खान म्हणाले, “‘तुला पाहता’ हे चित्रपटाचं शीर्षक मला खूप आवडलं. चित्रपटाचा ट्रेलर अतिशय सुंदर आणि मनाला भावणारा आहे. या चित्रपटाला माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.”

दोन काळ… दोन प्रेमकथा… एक भावनिक प्रवास

चित्रपटाच्या कथानकात ऐन तारुण्यात प्रेमात आकंठ बुडालेला एक तरुण अचानक आपल्या प्रेयसीच्या आयुष्यातून निघून जातो. अनेक वर्षांनंतर तो निवृत्त लष्करी अधिकारी म्हणून पुन्हा तिच्यासमोर उभा राहतो. त्याच्या अचानक परतण्याने तिच्या आयुष्यात कोणते भावनिक वादळ निर्माण होते, याची हळवी कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

याचबरोबर २०२६ मधील एका तरुण जोडप्याची आधुनिक प्रेमकथाही चित्रपटात समांतरपणे उलगडते. प्रेम, नातेसंबंध, एकत्र कुटुंब व्यवस्था, आठवणी आणि आयुष्याचे बदलते प्रवाह अशा अनेक भावनिक पैलूंना स्पर्श करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देणार आहे.

टीझर आणि गाण्यांनंतर ट्रेलरलाही उत्स्फूर्त प्रतिसाद

चित्रपटाच्या टीझरला आणि गाण्यांना सोशल मीडियावर प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आता ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. संवेदनशील लेखन, मनाला भिडणारं संगीत, प्रभावी अभिनय आणि भावनिक कथानकामुळे ‘तुला पाहता’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करेल, असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे.

१० जुलैपासून मराठी आणि हिंदी भाषांमध्ये जगभर प्रदर्शित होणारा ‘तुला पाहता’ हा चित्रपट प्रेक्षकांना प्रेम, नाती आणि आठवणींचा एक सुंदर भावविश्व अनुभवायला देणार आहे.

Leave a comment