‘आऊट ऑफ सिलॅबस – पुस्तकांच्या पलीकडे’च्या भव्य प्रीमियर सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष; चित्रपटाच्या टीमसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची हजेरी

चित्रपटसृष्टी, उद्योग, समाजकारण आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती

तरुणाईचा संघर्ष, शिक्षण व्यवस्थेतील वास्तव आणि सकारात्मक सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा आगामी मराठी चित्रपट ‘आऊट ऑफ सिलॅबस – पुस्तकांच्या पलीकडे’ याचा भव्य विशेष प्रीमियर शो नुकताच दिमाखात पार पडला. या सोहळ्याकडे चित्रपटसृष्टीसह सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि उद्योग क्षेत्राचे विशेष लक्ष लागले होते. चित्रपटाची संपूर्ण टीम तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.

प्रेरणादायी आशय असलेला चित्रपट

Adu-Tishu Production & Music प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि चित्रपट निर्माते डॉ. सुगत ग्यानेश्वर वाघमारे यांनी केली असून, आमदार डॉ. संजय कुटे हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन नवीन देशबोनिया यांनी केले असून, कथा आणि लेखन अनिकेत रामचंद्र कोरडे यांचे आहे. संकलनाची जबाबदारी अनिल विठ्ठल थोरात यांनी सांभाळली आहे.

पुस्तकांच्या चौकटीपलीकडे जाऊन आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देणारा हा चित्रपट तरुण पिढीला प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

कलाकारांनी शेअर केले चित्रीकरणाचे अनुभव

या खास प्रीमियर सोहळ्याला चित्रपटातील अजिंक्य राऊत, अद्वयी वाघमारे, शेषपाल गनवीर, अभिजित रामचंद्र आणि सानिका थोरसकर हे कलाकार उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत चित्रपटाच्या निर्मितीमागील अनुभव आणि आठवणी शेअर केल्या.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

या विशेष सोहळ्याला National Stock Exchangeचे Managing Director आणि CEO आशिष चौहान यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच आमदार डॉ. संजय कुटे (जळगाव जामोद), रणधीर सावरकर (अकोला पूर्व), हरीश पिंपळे (मूर्तीजापूर), नारायण कुचे (बदनापूर), किसन वानखडे (उमरखेड), वसंत खंडेलवाल (विधान परिषद सदस्य), हेमंत पाटील (नांदेड) आणि श्वेता महाले (चिखली) यांच्यासह चित्रपटसृष्टी, राजकारण, समाजकारण, उद्योग आणि विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. त्यामुळे हा प्रीमियर एक भव्य, दिमाखदार आणि संस्मरणीय सोहळा ठरला.

प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाची जोरदार चर्चा

समाजाभिमुख आशय, प्रेरणादायी कथा आणि तरुणांना नवी दिशा देणारा संदेश यामुळे ‘आऊट ऑफ सिलॅबस – पुस्तकांच्या पलीकडे’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेचा विषय ठरला आहे. प्रीमियरला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. तरुणाईसह सर्व वयोगटातील प्रेक्षकांच्या मनात हा चित्रपट नक्कीच स्थान निर्माण करेल, असा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला.

Leave a comment