
मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि बांग्ला भाषांतील ओरिजिनल्स, चित्रपट, स्पोर्ट्स आणि एआय-आधारित स्टोरीटेलिंगची मोठी घोषणा
मुंबई : भारतातील आघाडीच्या स्वदेशी व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Zee 5 ने आपल्या इतिहासातील सर्वात व्यापक आणि महत्त्वाकांक्षी बहुभाषिक कंटेंट स्लेटची घोषणा केली आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, मराठी, मल्याळम, कन्नड आणि बांग्ला या सात भाषांमध्ये सादर करण्यात आलेल्या या स्लेटमध्ये ओरिजिनल वेबसीरिज, चित्रपट, लोकप्रिय फ्रँचायझींचे नवे सीझन, लाईव्ह स्पोर्ट्स, एआय-आधारित स्टोरीटेलिंग, अॅनिमेशन आणि मुलांसाठी खास कंटेंटचा समावेश आहे. भारतीय संस्कृतीशी नाळ जोडणाऱ्या आणि भाषेच्या सीमांपलीकडे जाणाऱ्या कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा Zee 5 चा हा महत्त्वाचा प्रयत्न मानला जात आहे.
Zee 5 ने स्पष्ट केले की, मनोरंजन क्षेत्रात केवळ ट्रेंड्सचे अनुसरण करण्याऐवजी नवे ट्रेंड्स निर्माण करण्यावर त्यांचा भर राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक भाषेतील प्रादेशिक कथांना जागतिक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही स्लेट तयार करण्यात आली आहे. भारतातील विविध सांस्कृतिक पार्श्वभूमीतील कथा अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी प्लॅटफॉर्म सातत्याने प्रयत्नशील असल्याचे कंपनीने सांगितले.
या बहुभाषिक स्लेटसाठी Zee 5 ने देशातील नामांकित स्टुडिओ आणि निर्मिती संस्थांशी भागीदारी केली आहे. हिंदीमध्ये जिओ स्टुडिओज, मॅडॉक फिल्म्स, टिप्स फिल्म्स, पेन स्टुडिओज, रिलायन्स एंटरटेनमेंट यांसारख्या मोठ्या बॅनर्सची साथ लाभली आहे. मराठीमध्ये बहावा एंटरटेनमेंट, प्रतिसाद प्रॉडक्शन्स आणि कायरा कुमार क्रिएशन्स, तर तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि बांग्ला भाषांतील आघाडीच्या निर्मिती संस्थाही या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. बहुभाषिक चित्रपटांसाठी झी स्टुडिओजचीही महत्त्वाची भूमिका राहणार आहे.
हिंदी स्लेटमध्ये विनोद कांबळी यांच्या जीवनावर आधारित ‘कांबळी’, ‘द स्कॅम : लीक्ड’, ‘कॉफी किंग’, आर. माधवन सूत्रसंचालन करणार असलेला ‘जीना इसी का नाम है 2.0’ आणि ‘झी हॉरर शो’ यांसारख्या नव्या ओरिजिनल्सची घोषणा करण्यात आली. याशिवाय ‘रंगबाझ सीझन 4’, ‘जनावर 2’ आणि ‘बकैती सीझन 2’ या लोकप्रिय फ्रँचायझी नव्या सीझनसह परतणार आहेत. चित्रपट विभागात ‘है जवानी तो इश्क होना है’, ‘बंदर’, ‘भारत भाग्य विधाता’, ‘पूजा मेरी जान’, ‘सर्वगुण संपन्न’, ‘घमासान’, ‘इकरूप’ आणि ‘डालिम्ब’ यांसारखे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
प्रादेशिक भाषांमधील कंटेंटलाही यावेळी विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. तमिळमध्ये ‘अनंतकालम’, ‘ती कुरल’ आणि ‘डेमॉन्टे कॉलनी 3’ यांसारखे प्रकल्प सादर करण्यात आले आहेत. तेलुगूमध्ये ‘श्रीमती’, ‘ऑब्जेक्शन माय लॉर्ड’, ‘जयम्मु निश्चियम्मु रा’ तसेच ‘व्यंकी अनिल 5’, ‘एनबीके 111’ आणि ‘वृषकर्मा’ यांसारखे चित्रपट असतील. कन्नडमध्ये ‘अय्यना मने’चा नवा सीझन, ‘बिटकॉइन स्कॅम’ आणि ‘ऑपरेशन बंगारा’ यांची घोषणा करण्यात आली आहे. मल्याळममध्ये ‘अ क्वीन’, ‘मलाबार कप’, ‘केरल अंडरग्राउंड’ आणि ‘बालन द बॉय’ हे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.
मराठी प्रेक्षकांसाठी Zee 5 ने यावेळी खास सरप्राइज ठेवले आहे. लोकप्रिय वेबसीरिज ‘हे काय नवीन?’ नव्या सीझनसह परतणार असून, ‘अगा आई, आहो आई’ ही नवी ओरिजिनल मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचबरोबर ‘तुंबाडची मंजुला’ आणि ‘भूतं भयम्’ हे बहुचर्चित मराठी चित्रपटही Zee 5 वर प्रदर्शित होणार आहेत.
बांग्ला विभागात ‘श्वेतकाली’ आणि ‘लालबजार’ नव्या सीझनसह पुनरागमन करत असून ‘आलोर दोष’ आणि ‘प्रियो बंधू’ या नव्या ओरिजिनल्सचीही घोषणा करण्यात आली आहे. प्रत्येक भाषेतील स्थानिक संस्कृती, प्रेक्षकांच्या आवडी आणि प्रादेशिक कथांना केंद्रस्थानी ठेवून ही संपूर्ण स्लेट तयार करण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
Zee 5 चे बिझनेस हेड तेजकरण सिंग बजाज म्हणाले, “आम्ही केवळ मनोरंजन क्षेत्राचे अनुसरण करत नाही, तर त्याला नवी दिशा देण्यावर विश्वास ठेवतो. धाडसी कथा, नवे प्रयोग आणि भारतातील सर्वोत्तम निर्माते यांना एकत्र आणणारी ही आमची आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, वैयक्तिक अनुभव आणि दर्जेदार कंटेंटच्या माध्यमातून भारतातील सर्वात विश्वासार्ह स्वदेशी मनोरंजन व्यासपीठ उभारण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.”
Zee 5 चे चीफ कंटेंट ऑफिसर राघवेंद्र हुन्सूर म्हणाले, “या स्लेटमधील प्रत्येक प्रकल्पाची निवड अत्यंत विचारपूर्वक करण्यात आली आहे. प्रेक्षक आता विविध भाषा आणि प्रकारांतील कथा सहज स्वीकारत आहेत. त्यामुळे दर्जेदार, वेगळ्या आणि अर्थपूर्ण कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यावर आमचा भर राहील.”
स्क्रिप्टेड मनोरंजनासोबतच Zee 5 आपल्या लाईव्ह स्पोर्ट्स आणि फॅमिली एंटरटेनमेंटचा विस्तारही करत आहे. FIFA, Bundesliga, ILT Season 5 आणि तमिळनाडू कबड्डी यांसारख्या स्पोर्ट्स स्पर्धांसह ‘गरुड – एक योद्धा की गाथा’, ‘विक्रम बेताळ’, ‘शिव सती – एक अनंत प्रेम कहानी’, ‘परम सुंदरी चंद्रकांता’, ‘तिरुपती बालाजी’, ‘राम आंजनेय युद्ध’ आणि ‘अय्यप्पन’ यांसारख्या मालिकांचा समावेश करण्यात आला आहे. मुलांसाठी ‘शिवलोक के कुंडक्का मंडक्का’, ‘स्मार्ट किड्स’, ‘टेल्स ऑफ कृष्णा’ आणि ‘बँडबुध और बुडबक 2.0’ हे विशेष कार्यक्रमही उपलब्ध होणार आहेत.
या सर्व घोषणांमुळे Zee 5 ने भारतीय भाषांमधील ओरिजिनल कंटेंट, प्रादेशिक कथा आणि जागतिक दर्जाचे मनोरंजन यांचा संगम घडवत स्वतःला भारतातील सर्वात मोठ्या बहुभाषिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपैकी एक म्हणून आणखी भक्कमपणे उभे केले आहे. आगामी काळात विविध भाषांतील प्रेक्षकांसाठी अधिक समृद्ध, वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार मनोरंजन उपलब्ध करून देण्याचा त्यांचा निर्धार या स्लेटमधून स्पष्टपणे दिसून येतो.
