कान्स महोत्सवात पोहोचला ‘खालिद का शिवाजी’; अमेरिकन नागरिक मायकेल थेवर यांचा सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर

मुंबई / प्रतिनिधी
अमेरिकेत स्थायिक असलेले आणि मूळचे तामिळ भाषिक असलेले निर्माता मायकेल थेवर यांच्या ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाची निवड थेट फ्रान्सच्या प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवासाठी झाली आहे. येत्या १३ मेपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात ‘खालिद का शिवाजी’ हा सिनेमा जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार आहे.

शिवाजी महाराजांचा वेगळा पैलू अधोरेखित करणारी निर्मिती

छत्रपती शिवाजी महाराजांचा एक वेगळा सामाजिक, आध्यात्मिक आणि वैचारिक पैलू उलगडणारा ‘खालिद का शिवाजी’ हा सिनेमा यापूर्वी अजंता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवडला गेला होता. तिथे परीक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेला हा सिनेमा आता थेट जागतिक पातळीवर पोहोचत आहे.

मायकेल थेवर यांचा संघर्षमय प्रवास

मायकेल थेवर मूळचे तामिळ भाषिक असून ९० च्या दशकात शिक्षणासाठी मुंबईत आले. निर्मला निकेतन आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथून त्यांनी समाजकार्य आणि सामाजिक अभ्यासाचे शिक्षण घेतले. शिक्षण घेत असताना त्यांनी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात सामाजिक संस्थांमध्ये कार्य केलं. त्या काळात त्यांना केवळ आर्थिक अडचणींचा नाही तर सांस्कृतिक संघर्षांचाही सामना करावा लागला.

अमेरिकेतील यशस्वी उद्योग आणि सामाजिक जाण

पुढे मायकेल आणि त्यांची पत्नी सुषमा गणवीर अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी ओमनी सर्व्हिसेस नावाची वैद्यकीय क्षेत्रातील कंपनी सुरू केली. आज ते यशस्वी उद्योजक आहेत. आपल्या मराठी शिक्षण आणि समाजाचे उपकार लक्षात ठेवून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा निर्माण करण्याचा निर्णय घेतला. सुषमा गणवीर या या चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत.

ग्रामीण कलाकारांना दिली संधी, राज मोरे यांचे दिग्दर्शन

‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचे दिग्दर्शन राज मोरे यांनी केलं असून प्रसिद्ध अभिनेते गणेश अनासपुरे प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटात ग्रामीण भागातील अनेक नवोदित कलाकारांना देखील संधी देण्यात आली आहे. सध्या हा सिनेमा कान्स महोत्सवामुळे चर्चेत असून जागतिक चित्रपटप्रेमींमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची जागतिक ओळख अधोरेखित करणारा ‘खालिद का शिवाजी’ हा सिनेमा लवकरच सर्वांसमोर येणार आहे.

Leave a comment