
मराठी चित्रपटसृष्टीने एक अभिमानास्पद पाऊल पुढे टाकत “मुक्कम पोस्ट देवाच घर” या बहुचर्चित चित्रपटाने इतिहास रचला आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भारतीय भाषांमध्ये डब होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला असून, तो आता Amazon Prime Video वर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
कीमाया प्रॉडक्शन्स प्रस्तुत, महेश कुमार जायस्वाल आणि कीर्ती जायस्वाल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मराठीत प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद आणि प्रेम पाहता, निर्मात्यांनी हा चित्रपट इतर भाषांमध्ये पोहोचवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मते, “ही कथा केवळ मराठी माणसांची नाही, तर सर्वसामान्य भारतीयांच्या भावविश्वातील आहे. म्हणूनच ती अधिकाधिक भाषांमध्ये पोहोचणे गरजेचे होते.”
भावनिक खोली, निरागसता आणि उबदारपणाचा अनोखा अनुभव
“मुक्कम पोस्ट देवाच घर” हे केवळ एक चित्रपट नसून, एक अनुभव आहे. या चित्रपटाच्या कोरभरसुद्धा प्रेक्षकांच्या मनाला भिडतात. साधेपणातले सौंदर्य, कुटुंबातील नातेसंबंधांचा हळुवार प्रवास, आणि त्यामागची खोल सामाजिक जाण — यामुळेच हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात खोलवर रुजतो.
जागतिक स्तरावर पोहोचण्याचा निर्धार
या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोच वाढवण्यासाठी आता जागतिक रिलीजची तयारी सुरू करण्यात आली आहे. भारतीय भाषांमधील डबिंगनंतर आता हा चित्रपट वेगवेगळ्या देशांतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची दृष्टीही निर्मात्यांनी ठेवली आहे.
“मुक्कम पोस्ट देवाच घर” हे उदाहरण ठरले आहे की मराठी चित्रपट जागतिक व्यासपीठावरही किती प्रभावी ठरू शकतो, जर त्यामागे मनापासूनची निर्मिती आणि कथेमागील प्रामाणिकपणा असेल.
