
चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, कलाकारांची तगडी फौज सज्ज
हेक्सव्हिजन एंटरटेनमेंट, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स, लॅब्रोस एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत, ‘आंबट शौकीन’ या आगामी मराठी विनोदी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. निखिल वैरागर दिग्दर्शित या सिनेमात विनोदाची जबरदस्त मेजवानी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
निखिल, अक्षय आणि किरणची भन्नाट त्रिकूट
या चित्रपटात निखिल वैरागर, अक्षय टंकसाळे आणि किरण गायकवाड या तीन मित्रांची सोशल मीडियाच्या दुनियेत अडकलेली धमाल सफर पाहायला मिळणार आहे. हे तिघं मिळून काय अतरंगी उद्योग करतात, याची झलक पोस्टरमधूनच उत्सुकता निर्माण करते.
पूजा सावंतसह मोठी कलाकार मंडळी
चित्रपटात पूजा सावंतही झळकणार असून तिची भूमिका काय वळण घेते, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. त्यांच्यासोबत प्रार्थना बेहेरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर, मोनालिसा बागल, अमेय वाघ यांच्यासह चिन्मय संत, राहुल मगदूम, श्रीकांत यादव, गौतमी पाटील, शुभंकर एकबोटे अशी दमदार स्टारकास्ट सज्ज आहे.
दिग्दर्शक निखिल वैरागर यांचा विश्वास
“‘आंबट शौकीन’ ही केवळ विनोदी कथा नाही, ती आजच्या डिजिटल जगात हरवलेल्या नात्यांची, वेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेली सफर आहे. उत्तम कलाकार, बोलके संवाद आणि हसवणारी पटकथा यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांना हसवत हसवत विचारही करायला लावेल,” असं दिग्दर्शक निखिल वैरागर यांनी सांगितलं.
१३ जूनला थेट प्रेक्षकांच्या भेटीला
चित्रपटाची कथा निखिल वैरागर यांची असून, प्रफुल्ल काकाणी, रंजना मोहित लखोटिया, अनघ भुतडा आणि निलेश राठी हे निर्माते आहेत. पटकथा व संवाद यासाठी अक्षय टंकसाळे व अमित बेंद्रे यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
१३ जून २०२५ रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, एक धमाल, विनोदी आणि मनोरंजक अनुभव देणारा ठरणार आहे.
