
मुंबई : मराठी दूरचित्रवाणी विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या शेटे आता आपल्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहे. विविध मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या ऐश्वर्याची आता दिग्दर्शक संदीप दंडवते यांच्या ‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकातून रंगमंचावर दमदार एंट्री होत आहे. प्रवीण भोसले, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी, सुनंदा काळुसकर आणि भरत नारायणदास ठक्कर या पाच निर्मात्यांनी एकत्र येत या नाटकाची निर्मिती केली आहे.

मालिकांमधील धावपळ, कॅमेऱ्यासमोरील अभिनय आणि सततच्या शूटिंगच्या वेळापत्रकातून थेट रंगभूमीवर येण्याचा अनुभव ऐश्वर्यासाठी विशेष ठरत आहे. नाटकाच्या तालमीदरम्यान अभिनयातील बारकावे, संवादातील विविध छटा आणि पात्रांच्या भावविश्वाचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळत असल्याचे ती सांगते. मालिकांमुळे प्रसिद्धी मिळते, मात्र रंगमंचावर प्रेक्षकांच्या थेट प्रतिक्रियांचा अनुभव हा कलाकारासाठी वेगळाच आनंद देणारा असतो, असे तिचे मत आहे.
या नाटकात ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक हे ऐश्वर्याच्या आई-वडिलांच्या भूमिकेत आहेत. तालमींच्या काळात या दोन्ही दिग्गज कलाकारांकडून खूप काही शिकायला मिळाल्याचे ती आवर्जून सांगते. सुकन्या मोने यांची माया आणि गिरीश ओक यांचा अनुभव यामुळे नाटकातील वातावरण कुटुंबासारखे वाटू लागल्याची भावना तिने व्यक्त केली.
‘आता थांबवायचं कसं?’ हे नाटक केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून आजच्या पिढीसमोरील संवादाचा अभाव, मोबाईलचे वाढते व्यसन आणि पालक-मुलांमधील वाढत चाललेली दरी या विषयांवर भाष्य करणारे आहे. “निर्जीव फोन स्मार्ट झालाय आणि जिवंत माणूस बावळट” हे नाटकातील वाक्य आजच्या वास्तवावर अचूक बोट ठेवते, असे ऐश्वर्या म्हणते.
मालिका विश्वात जसे प्रेक्षकांनी प्रेम दिले, तसेच प्रेम रंगभूमीवरही मिळेल, असा विश्वास व्यक्त करत तिने तरुणांनी आणि त्यांच्या पालकांनी हे नाटक एकत्र येऊन पाहावे, असे आवाहन केले आहे.
