
झी मराठीवरील ‘तुला जपणार आहे’ या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून, यामध्ये आईच्या अतूट प्रेमाची आणि त्यागाची कथा सांगण्यात येणार आहे. या मालिकेतून अभिनेत्री शर्वरी लोहोकरे झी मराठीवर कमबॅक करत आहे. तसेच, नीरज गोस्वामी, प्रतीक्षा शिवणकर, मिलिंद फाटक, पूर्णिमा तळवलकर, निलेश रानडे यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
आईच्या मायेची अलौकिक गोष्ट

‘तुला जपणार आहे’ ही एका आईच्या निस्वार्थ प्रेमाची कथा आहे – अंबिकाची, जिने आपल्या मुलीच्या संरक्षणासाठी स्वतःला वाहून घेतलं आहे. तिच्या मृत्यूनंतरही ती आत्मारूपात आपल्या कुटुंबाच्या भोवती असते.
मात्र, मृत्यूनंतर तिला घरातील बदललेले फासे, तिच्या मुलीच्या आयुष्याला मिळालेला धोक्याचा इशारा, आणि वडिल-मुलीच्या नात्यात निर्माण झालेली दरी दिसू लागते.
अंबिकाच्या हृदयातील व्याकूळ साद देवी ऐकते आणि तिच्या मुलीच्या रक्षणासाठी मीराला पाठवते – एक अशी मुलगी, जिला देवीवर विश्वास नाही, जी तिच्या नियतीवर नाराज आहे.
परंतु, या गूढ घटनेत एक रहस्य दडले आहे – कारण मीरा ही एकमेव व्यक्ती आहे, जी आत्मारूपातील अंबिकाला पाहू शकते, तिला स्पर्श करू शकते आणि तिच्यासोबत देवळाच्या पायऱ्याही चढू शकते.
या दोघींच्या नात्यामागील गूढ काय आहे? अंबिकाच्या मदतीने मीरा तिच्या मुलीचे जीवन कसे वाचवणार?
हॉरर, थ्रिलर आणि कौटुंबिक नाट्याचा संगम

‘तुला जपणार आहे’ ही मालिका फक्त कौटुंबिक नात्यांची गोष्ट नसून, यात थरार, रहस्य आणि अलौकिक घटना यांचा रोमांचकारी प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
मालिकेतील दृश्य larger-than-life असणार आहेत, ज्यात VFX चा प्रभावी वापर प्रेक्षकांना एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणार आहे.
कलात्मक टीम आणि निर्मिती
या मालिकेच्या कथा-पटकथेचे लेखन चेतन सैंदाणे यांनी केले असून, संवाद लेखन पूर्णानंद वांढेकर यांनी केले आहे. मालिकेचे निर्माते आयरिस प्रोडक्शन्सचे विद्याधर पाठारे आहेत.
आईच्या प्रेमाची अलौकिक ताकद अनुभवण्यासाठी तयार व्हा

“जेव्हा आईच्या प्रेमाची साद देवी ऐकते, तेव्हा फक्त संरक्षण नाही, तर चमत्कार घडतो!”
ही प्रत्येक आईच्या आपल्या बाळासाठी असलेल्या भावना सांगणारी कथा आहे.
या अद्भुत प्रवासाचा साक्षीदार होण्यासाठी पाहायला विसरू नका –
📺 ‘तुला जपणार आहे’, १७ फेब्रुवारीपासून, रात्री १०.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर!
