मराठमोळा रॅपर रॉक्सनच्या गाण्यांची हिप-हॉपमध्ये क्रेझ

मराठी संगीत क्षेत्रात सध्या हिप-हॉपचा वेगाने वाढणारा ट्रेंड पाहायला मिळत असून, या नव्या लाटेत दमदार ठसा उमटवणारे नाव म्हणजे रॉक्सन. आपल्या प्रभावी गीतलेखन, स्पष्ट मांडणी आणि वास्तवाशी जोडलेल्या आशयामुळे रॉक्सनने अल्पावधीतच संगीतप्रेमींच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.

राज्य पुरस्कार नामांकनामुळे चर्चेत

रॉक्सनच्या कारकिर्दीला आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठता आला आहे. ६२ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘नवरदेव बी.एस्सी. ॲग्री’ या चित्रपटातील “लाल चिखल” या गीतासाठी त्याला उत्कृष्ट गीताचे नामांकन मिळाले आहे. या गाण्यातून समाजातील वास्तव आणि शेतकऱ्यांच्या समस्या प्रभावीपणे मांडण्यात आल्या असून, त्यामुळेच या गाण्याला विशेष दाद मिळाली आहे.

‘गुलाबाच्या फुला’ने दिली ओळख

२०१७ पासून संगीत आणि रॅपिंग क्षेत्रात सक्रिय असलेल्या रॉक्सनला २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या “गुलाबाच्या फुला” या गाण्यामुळे मोठी ओळख मिळाली. या गाण्याने त्याला मराठी रॅपर म्हणून वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि त्याच्या कारकिर्दीला नवी दिशा दिली. त्यानंतर ‘दिग्गज’, ‘रक्कम’, ‘महान’, ‘सल्तनत’ यांसारख्या गाण्यांनी त्याची लोकप्रियता अधिक वाढवली.

सामाजिक आशयाची ठसठशीत मांडणी

रॉक्सनच्या संगीताची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचा आशय. युवकांचे प्रश्न, संघर्ष आणि वास्तव जीवनातील अनुभव यांना तो आपल्या गाण्यांमधून स्पष्ट आणि प्रभावीपणे मांडतो. पारंपरिक मराठी संस्कृती आणि आधुनिक हिप-हॉप यांचा संगम त्याच्या कामात दिसून येतो, त्यामुळे त्याची गाणी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित राहत नाहीत, तर समाजाला विचार करायला भाग पाडतात.

डिजिटल युगातील दमदार उपस्थिती

आजच्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर रॉक्सनने आपली मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे. त्याच्या गाण्यांना विशेषतः तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, मराठी हिप-हॉपला नव्या उंचीवर नेण्यात त्याचा मोठा वाटा आहे. सोशल मीडियावर त्याच्या लेटेस्ट फोटोशूटचीही चर्चा सुरू असून, त्याच्या वाढत्या लोकप्रियतेची हीच साक्ष आहे.

मराठी हिप-हॉपचा नवा आवाज

रॉक्सनचा आतापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी ठरत असून, तो मराठी संगीत क्षेत्रातील नव्या पिढीचा प्रतिनिधी आवाज म्हणून समोर येत आहे. आशयपूर्ण आणि प्रभावी मांडणीमुळे आगामी काळात त्याच्याकडून अधिक नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट्सची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a comment