
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ या लोकप्रिय एकपात्री नाटकाचा ६०० वा प्रयोग उत्साहपूर्ण वातावरणात आणि प्रेक्षकांच्या दणदणीत प्रतिसादात पार पडला. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर रंगलेला हा विशेष प्रयोग एका अनोख्या सरप्राईजमुळे अधिकच भावनिक आणि संस्मरणीय ठरला.
मित्रांकडून खास सरप्राईज
या सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरलं ते अभिनेता संदीप पाठक यांना त्यांच्या बालपणीच्या जिवलग मित्रांनी दिलेलं खास सरप्राईज. मिलिंद कुलकर्णी, निलेश चांडक, डॉ. सुशील मुगडिया, सुशील जेठलिया, अॅड. वर्षा मुंदडा, डॉ. प्रसाद देशमुख आणि संजय सावंत या मित्रांनी एकत्र येत विमानाचं भव्य कटआऊट तयार केलं होतं. नाट्यगृहात प्रवेश करतानाच जणू विमानात चढत आहोत, असा अनुभव देणारी सजावट करण्यात आली होती.
उत्सवमय वातावरण आणि सन्मान सोहळा
रेड कार्पेट, रांगोळी, सनई-चौघडे आणि प्रेक्षकांना अत्तर लावून केलेलं स्वागत यामुळे संपूर्ण वातावरण उत्सवमय झालं होतं. यावेळी केक कटिंगसोबतच शाल-श्रीफळ देऊन संदीप पाठक तसेच निर्माते संदीप सोनार आणि समीर हंपी यांचा सन्मान करण्यात आला.
भावनिक क्षण आणि कृतज्ञतेची भावना
या अनपेक्षित सन्मानाने भारावलेल्या संदीप पाठक यांनी भावना व्यक्त करत सांगितलं की, आयुष्यात सर्वात मोठं कमावलेलं संपत्ती म्हणजे माणसं आहेत. मित्र, कुटुंब आणि सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळेच हा प्रवास शक्य झाला असून, असा सरप्राईज आयुष्यभर लक्षात राहील.
‘वऱ्हाड’ची परंपरा आणि नवा प्रवास
ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. लक्ष्मण देशपांडे यांनी गाजवलेलं ‘वऱ्हाड’ हे एकपात्री नाटक गेली अनेक वर्षं प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. अभिनेता संदीप पाठक यांनी आपल्या खास शैलीत या नाटकाला नव्या पिढीपर्यंत पोहोचवत त्याचा वारसा पुढे नेला आहे. मराठवाडी बोली, बावन्न व्यक्तिरेखांचा बहारदार आविष्कार आणि अफाट ऊर्जा यामुळे हे नाटक आजही तितकंच टवटवीत आणि प्रेक्षकप्रिय ठरत आहे.
एकूणच, ‘वऱ्हाड निघालं लंडनला’चा ६०० वा प्रयोग हा केवळ एक टप्पा नसून, मैत्री, कृतज्ञता आणि रंगभूमीवरील नात्यांचा एक अविस्मरणीय सोहळा ठरला.
