मैत्रीचा वारसा जपण्यासाठी विनय येडेकर यांची नवी सुरुवात; ‘ए.. भाऊ डोकं नको खाऊ!’ मधून रसिकांच्या भेटीला!

मराठी रंगभूमीवर आपल्या खास अभिनयशैलीने वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते विनय येडेकर आता एका नव्या आणि विशेष भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहेत. रॉयल थिएटर निर्मित आणि मिहिर गवळी यांच्या निर्मितीतील ‘ए.. भाऊ डोकं नको खाऊ!’ या नव्या नाटकाचा शुभारंभ होत असून, या निमित्ताने रंगभूमीवर एक वेगळीच रंगत अनुभवायला मिळणार आहे.

अतुल परचुरे यांच्या आठवणींना उजाळा देणारी भूमिका

या नाटकाची निवड करताना विनय येडेकर यांच्यासाठी केवळ संहिता नव्हती, तर त्यामागे एक भावनिक नातंही होतं. दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांनी यापूर्वी गाजवलेली भूमिका पुन्हा साकारणं, ही त्यांच्यासाठी श्रद्धांजलीसारखी आहे. तालमीदरम्यानही त्या आठवणींना उजाळा देत, त्या भूमिकेला न्याय देण्याचा ते प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.

विनोदाची अचूक पकड आणि जुने ट्यूनिंग

या नाटकाचं दिग्दर्शन संतोष पवार यांनी केलं असून, त्यांचं आणि विनय येडेकर यांचं जुने ट्यूनिंग प्रेक्षकांना नाटकात स्पष्ट जाणवणार आहे. त्यांच्या अभिनयातील टायमिंग आणि संवादांची धार यामुळे नाटकातील विनोद अधिक प्रभावीपणे सादर होणार आहे.

तगडा नटसंच आणि सक्षम तांत्रिक फळी

या नाटकात विनय येडेकर, संतोष पवार यांच्यासोबत आनंदा कारेकर, सानिका शिंदे, सोनाली मगर, आदित्य गटे आणि संकेत बिवलकर या कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे. नाटकाच्या तांत्रिक बाजू संदेश बेंद्रे (नेपथ्य), शीतल तळपदे (प्रकाशयोजना), आशुतोष वाघमारे (संगीत) आणि हास्या पवार (वेशभूषा) यांनी समर्थपणे सांभाळल्या आहेत.

शुभारंभाचे प्रयोग

०१ मे २०२६ – रात्री ८.३० वा.
यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई

०२ मे २०२६ – दुपारी ४.०० वा.
मीनाताई ठाकरे नाट्यगृह, बोरिवली, मुंबई

निखळ मनोरंजन, विनोदाची भन्नाट मेजवानी आणि मैत्रीच्या आठवणींना उजाळा देणारं ‘ए.. भाऊ डोकं नको खाऊ!’ हे नाटक रसिकांसाठी एक खास अनुभव ठरणार आहे.

Leave a comment